सांगा कसं जगायचं, कण्हत की गाणं म्हणत… भावे पदक स्वीकारत प्रशांत दामले यांचा दिलखुलास संवाद

सांगा कसं जगायचं, कण्हत की गाणं म्हणत… भावे पदक स्वीकारत प्रशांत दामले यांचा दिलखुलास संवाद
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा… असा दिलखुलास संवाद साधत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. प्रशांत दामले यांनी भावे पुरस्काराच्या आनंदात रसिकांना सामील करून घेतले. ज्यांनी नाटक सुरू केलं, त्या भावे यांच्या नावाचं गौरव पदक मिळणं हा माझ्या आयुष्यातला आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक गेली चार दशके मराठी रसिकमनावर अधिराज्य गाजवणार्‍या डॉ. प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात आले. मान्यवर रंगकर्मी आणि कलाकारांच्या उपस्थितीत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते त्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले. गौरवपदक आणि 25 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. दामले म्हणाले, इतकी वर्षे मी रंगभूमीवर काम करतोय. माझ्यासाठी हा पुरस्काराचा क्षण अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. रंगभूमीवर काम केल्याने आत्मविश्वास मिळतो, तसेच जबाबदारीही येते. हे पदक स्वीकारताना त्याची जबाबदारीही माझ्या लक्षात आहे. त्यांनी जे काम केलं, त्याच्या जवळपास इतकं तरी काम करायचा मी प्रयत्न करेन.

मंत्री खाडे यांनी खुमासदार शैलीत दामले यांना शुभेच्छा दिल्या. मी आपला फॅन आहे. कामगार असताना मी आपले ब्रह्मचारी नाटक पाहिले होते. तुम्ही कलाकार भाषण करून पैसे मिळवता; पण आम्ही राजकारणी भाषण करून पैसे देतो. दोन भाषणे केली तरी आम्ही गळून जातो. पण तुम्ही एकाच दिवशी चार चार नाट्यप्रयोग कसे काय करता, असा सवाल त्यांनी दामले यांना केला. माणसांच्या आयुष्यात आनंद दिल्याबद्दल तुम्ही शतायुषी व्हा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

विविध संस्थांच्या वतीनेही दामले यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी स्वागत, तर डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी प्रास्ताविक केले. धनश्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विलास गुप्ते यांनी आभार मानले.
या सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्यासह नाट्य परिषदेचे सदस्य, समिती सदस्य मेघा केळकर, जगदीश कराळे, बलदेव गवळी, विवेक देशपांडे उपस्थित होते.

एसी बसतील

नाट्यरसिकांंसाठी आम्ही सांगलीत 25 कोटीचे नवीन नाट्यगृह उभे करीत आहोतच; पण यासोबत सांगलीतील भावे नाट्यमंदिर आणि मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिरमध्ये एसीचीही सोय करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री खाडे यांनी दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news