

वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता ‘तारा’ची डरकाळी घुमणार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंदा वाघीण एक हजार कि.मी.चा 27 तासांचा प्रवास करत शुक्रवारी पहाटे चांदोलीत (जि. सांगली) दाखल झाली. तिला सोनार्ली येथील ‘एनक्लोजर’मध्ये सोडण्यात आले. याकरिता राबविण्यात आलेले ‘ऑपरेशन तारा’ फत्ते झाले असून, लवकरच आणखी सात वाघ आणण्यात येणार आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन नर आणि पाच मादी असे आठ वाघ आणण्यात येणार आहेत. ते ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून स्थानांतरित करण्यास केंद्र शासनाच्यापर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार ‘ऑपरेशन तारा’अंतर्गत ताडोबातील चंदा वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आली.
‘चंदा’चे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता ‘तारा’असे नामकरण केले असून तिला ‘एसटीआर-टी 04’ असा सांकेतिक क्रमांकही देण्यात आला आहे. भारतीय वन्यजीव संस्था (डब्ल्यूआयआय) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षिततेचे सर्व मानदंड वापरून स्थानांतराची ही मोहीम राबविण्यात आली. चंद्रपूर येथील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.
सुमारे तीन वर्षांच्या चंदा वाघिणीला ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. तिला योग्य पशुवैद्यकीय उपचार देऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे समर्पित करून वन्यजीव वाहतुकीसाठीच्या विशेष वाहनातून स्थलांतरित करण्यात आले.
बुधवारी (दि. 12) ताडोबा येथून रात्री दहा वाजता तिचा प्रवास सुरू झाला. शुक्रवारी रात्री दीड वाजता या वाघिणीला घेऊन पथक चांदोली येथे दाखल झाले. सर्व तपासण्यानंतर रात्री 3 वाजून 20 मिनिटांनी तिला ‘एनक्लोजर’मध्ये सोडण्यात आले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, विभागीय वन अधिकारी स्नेहलता पाटील, सहायक वन संरक्षक संदेश पाटील, बाबासाहेब हाके, चांदोली वन क्षेत्रपाल ऋषीकेश पाटील, आंबा वन क्षेत्रपाल प्रदीप कोकीतकर, ढेबेवाडीचे वन क्षेत्रपाल किरण माने, संग्राम गोडसे, मानद वन्य जीव रक्षक रोहन भाटे, आकाश पाटील यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.