

BJP workers meeting Khanapur
विटा : येत्या दोन वर्षांत श्रीक्षेत्र रेवणसिद्ध मंदिरासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. तसेच, बाणूरगड आणि भाळवणी या ऐतिहासिक गावांसाठीही मोठा निधी मंजूर केला जाईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. ते आळसंद (ता. खानापूर) येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या मेळाव्यात मंत्री गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सागर सोनवले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मंत्री गोरे म्हणाले, खानापूर मतदारसंघात आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे संघटन बळकट होत आहे. येत्या साडेचार वर्षांत पक्ष परिवर्तन घडवून आणेल. बाणूरगड व भाळवणी या ऐतिहासिक स्थळांवर स्मारके उभारणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. आमदार पडळकर जे मागतील, ते देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ हटविला आहे. पक्षात कार्यकर्ताच मालक असतो. बाणूरगडला बहिर्जी नाईकांचे, तर भाळवणीला संताजी घोरपडे यांचे स्मारक उभारावे, तसेच खानापूर आणि सुलतानगादे या गावांचेही नामकरण करावे.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना सांगितले, सत्तेचा माज उतरविण्याचे काम आमदार पडळकरांनी केले आहे. यावेळी सांगली जिल्हा परिषदेतही भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे.
या कार्यक्रमाला भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.