

इस्लामपूर : येथील सराईत गुन्हेगार रोहित पंडित पवार (वय 22, रा. बेघर वसाहत) याच्या खूनप्रकरणी युवकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. हौसेराव कुमार आंबी (वय 21, रा. हुबालवाडी, ता. वाळवा) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणातील दोघा अल्पवयीनांची सांगली येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
येथील इस्लामपूर-ताकारी रस्त्यावरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सराईत गुन्हेगार रोहित पवार याचा खून करण्यात आला होता. खुनानंतर संशयित हौसेराव व त्याचे साथीदार पोलिस ठाण्यात हजर झाले होते.
पोलिसांनी त्यांना अटक केली. खुनाच्या घटनेनंतर अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक सचिन थोरबोले इस्लामपूर पोलिस ठाण्यात आले. त्यांनी तपासाबाबत सूचना केल्या. पवार याचा खून आर्थिक देव-घेवीतून झाल्याची चर्चा शहरात होती. शुक्रवारी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पारळी, दुचाकी जप्त केली. शनिवारी आंबी याला न्यायालयात हजर करण्यात आले.