

इस्लामपूर : येथील सराईत गुंड रोहित पंडित पवार (वय 22, रा. बेघर वसाहत) याचा पूर्ववैमनस्यातून डोक्यात पारळीने हल्ला करून खून करण्यात आला. येथील इस्लामपूर-ताकारी रस्त्यावरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खुनानंतर संशयित हौसेराव कुमार आंबी (वय 21, रा. हुबालवाडी, ता. वाळवा) आणि त्याचे दोघे अल्पवयीन साथीदार स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले. याप्रकरणी ओंकार राजेंद्र गुरव (रा. इस्लामपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. खुनाच्या कारणावरून शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अल्पवयीन मुलाचा व रोहित यांचा वाद झाला होता. दुचाकी आडवी मारून ते एकमेकांना खुन्नस देत होते. तीन दिवसापूर्वी रोहित हा त्या मुलाच्या घरी गेला होता. त्यावेळी तो मुलगा घरात नव्हता. तेव्हा त्याने मुलाच्या घरच्यांना शिवीगाळ केली होती. त्याचा राग मुलाच्या मनात होता. इस्लामपूर - ताकारी रस्त्यावरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर रोहित असल्याची माहिती मुलाला मिळाली. त्याचा अल्पवयीन साथीदार व हौसेराव आंबी हे तिघे दुचाकीवरून तेथे गेले. रस्त्याकडेला रोहित उभा होता. तेथे आंबी, दोन अल्पवयीन मुले व रोहित यांच्यात वाद झाला. वादातून रोहितने हल्ला करण्यासाठी चाकू काढला. त्यावेळी हौसेराव व त्याच्या अल्पवयीन साथीदाराने पारळीने त्याच्या डोक्यात वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून तिघांनी तेथून पलायन केले.
आसपासच्या नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेत रोहितला इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनीही उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. डोक्यात खोलवर वार झाल्याने रोहितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खुनाची माहिती मिळताच त्याच्या मित्रांनी, नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती.
आंबी व त्याचे साथीदार दुचाकीवरून इस्लामपूर पोलिस ठाण्यात हजर झाले. अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यास भेट दिली. त्यांनी संशयित हौसेराव आंबी व अल्पवयीन मुलांकडे कसून चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.
रोहित पवार याच्यावर हल्ला होण्याआधी काही तास त्याने सोशल मीडियावर ‘नाम मेरा वही है... पर मै वो नही, जो पहले था! सॉरी, सिस्टिम अपडेट...’ अशा मजकुराची स्टोरी ठेवली होती. यातून त्याला नेमका कोणाला व काय संदेश द्यायचा होता, याची चर्चा आहे. मात्र, त्याचा संदेश व्हायरल होताच तिघांनी रोहितचा काटा काढला.
रोहित पवारच्या आई-वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. तो त्याच्या मावशीकडे राहत होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रोहितला गांजाचे व्यसन होते. दोन खुनीहल्ले, जबरी चोरी, मारहाण असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याचा साथीदार नितीन पालकर याचाही दोन महिन्यांपूर्वी येथील बहे नाका परिसरात खून झाला आहे.
इस्लामपुरात खुनांची मालिकाच सुरू आहे. या वर्षात कामगार, शेतमजूर महिला हानिफाबी मदनसाब मुल्ला, छायाचित्रकार गौरव हेमंत कुलकर्णी, सराईत गुन्हेगार नितीन पालकर आणि आता रोहित पवार याचा खून झाला. सलग पाच खुनांनी शहर हादरले. किरकोळ कारणावरून खून होत असल्याने पोलिसही हतबल झाले आहेत. पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.