विटा : जोंधळखिंडी येथे शेततळ्यात बुडून लेंगरेतील एका सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. कैलास उर्फ रामचंद्र विठोबा शिंदे (वय.६२) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.9) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जोंधळ खिंडीचे पोलिस पाटील चंद्रकांत मधुकर घाडगे यांनी विटा पोलिसांत या घटनेचे वर्दी दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील कैलास शिंदे यांचे जोंधळखिंडी गावात शेत आहे. या शेतात त्यांनी मोठे शेततळे काढले आहे. शेततळ्यातील पाण्यात त्यांनी मत्स्य पालन देखील केले होते. मंगळवारी दुपारी ते लेंगरे येथून घरातून शेतात जातो, असे सांगून दुचाकीने बाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरा पर्यंत परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली.
बुधवारी सकाळी त्यांची दुचाकी शेततळ्याच्या नजीक आढळून आल्याने ग्रामस्थांना संशय आला. त्यानंतर शेततळ्यात शोधा शोध सुरू केली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला. शेततळ्यात पाय घसरून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस पथकाने जोंधळ खिंडी येथे घटनास्थळी भेट दिली. मृत कैलास शिंदे हे मुंबई येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.