Beed News | दसऱ्याचे धुणे धुताना तलावात बुडून एकाचा मृत्यू
चाकूर : तालुक्यातील भाट सांगवी येथील पती पत्नी दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गल्यावर तलावाच्या पात्रात पडलेली पिशवी काढण्याचा प्रयत्न करताना पाय घसरल्याने बालाजी कोंडिबा वाघमारे (वय ५३) हे बुडून मरण पावले. तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या पत्नी गयाबाई (वय ४५) याही बुडत असताना त्यांनी आराडा ओरड केली व तेथील शेतकऱ्यांनी साडीचा दोरासारखा वापर करीत त्यांना बाहेर काढल्याने त्या बालंबाल बचावल्या मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास भाटसांगवी तलावावर ही घटना घडली. तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर बालाजी यांचा मृतदेह अग्नीशमन पथकाच्या जवानांच्या हाती लागला.
वालाजी वाघमारे आणि त्यांच्या पत्नी हे गावातील पाझर तलावावर दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेले होते. दोघांनीही धुणे धुतले. या दरम्यान एक पिशवी हातून निसटली व ती पाण्यात पुढे जाऊ लागली ती पकडण्यासाठी बालाजी झुकले व त्यांचा तोल गेला.
पोहता येत नसल्याने ते गंटागळ्या खाऊ लागले त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न करताना गयाबाईही पात्रात पडल्या. यावेळी त्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्यावे तेथे शेतकरी आले व त्यांनी तेथील साडी त्यांच्या दिशेने फेकली व त्याला गयाबाईने धरले व त्यांना तलावाबाहेर काढण्यात आले. बालाजी वाघमारे यांच्या मृत्यूने भाटसांगवी व चाकूर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार असून बालाजी वाघमारे हे शेतमजूर म्हणून रोजंदारीवर काम करीत होते.