पाटण ः पुढारी वृत्तसेवा
शनिवार दुपारपासून जवळपास दीड दिेवस झोडपून काढणार्या पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र सोमवारी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पहावयास मिळाले. पावसाचा जोर ओसरल्याने धरणाच्या शिवसागर जलाशयात सरासरी 36 हजार 124 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होत आहे. धरणात सध्या 41.40 टीएमसी पाणीसाठा असून मागील चोवीस तासात पाणीसाठ्यात 3.12 टीएमसीने वाढ झाली आहे.
कोयना धरणात 41.40 टीएमसी पाणीसाठा
चोवीस तासात 3.12 टीएमसी पाणीसाठा.
पाणी उंचीमध्ये 5.1 फुटाने वाढ
रविवारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली होती. तथापि रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर ओसरला होता. सोमवारी मात्र दिवसभर बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीत पाहायला मिळाली. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्यापही तब्बल 63.85 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. मागील चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 3.12 टीएमसीने तर पाणी उंचीत 5.1 फूट वाढ झाली आहे. रविवार संध्याकाळी पाच ते सोमवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात व आजपर्यंतचा एकूण पाऊस कोयना 72 मिलिमीटर (1 हजार 989), नवजा 105 मिलिमीटर (2 हजार 315) तर महाबळेश्वर 59 मिलिमीटर (1 हजार 764) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या एकूण 39.33 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
दरम्यान रविवारी झालेल्या पावसात तालुक्यात काही ठिकाणी अंशतः नुकसान, पडझड झाली असून संबंधित नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसिलदार अनंत गुरव यांनी दिले आहेत. याशिवाय नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.