इस्लामपूर : अशोक शिंदे
कासेगाव शिक्षण संस्थेच्या इस्लामपूरजवळील साखराळे येथील आरआयटी इंजिनिअरिंग कॉलेजचा पदवी प्रदान सोहळा होता. दिवस होता रविवार, 10 नोव्हेंबर 2013. पदवी प्रदान करायची होती 450 वर विद्यार्थ्यांना. प्रमुख पाहुणे होते उद्योग जगताचा लखलखता ध्रुवतारा, उद्योगपती, पद्मभूषण रतन टाटा. वयाचा विचार करून त्यांना आयोजकांनी विनंती केली की, विद्यार्थी संख्या खूप आहे, खुर्चीवर बसून आपण पदवी प्रदान करावी. पण खुर्चीवर न बसता उभे राहून, सुहास्यवदनाने त्यांनी पदव्या प्रदान केल्या. या प्रसंगाने उपस्थित भारावून गेलेले. विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देताना चेहरा हसतमुख ठेवत ते विद्यार्थ्यांशी एकरूप होत होते आणि विद्यार्थी देखील त्यांच्या समक्ष भेटीने भारावून जात होते.
पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले आणि इस्लामपूर दौर्यावेळच्या अनेक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. अनेकांचे डोळे पाणावले. पदवी प्रदान समारंभात त्यांना जवळून पाहण्यासाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वमान्य दिग्गज उद्योगपतीला अनुभवण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. टाटा यांनी इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाला त्यावेळी दिलेली सुमारे नऊ कोटी रुपयांची मदत, त्या संपूर्ण दिवसातील त्यांच्या सहवासातील अनेक प्रसंग पुन्हा जागे झाले. टाटा यांनी तब्बल सहा तास इस्लामपूर परिसरासाठी दिले होते. तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील त्यांच्या स्वागतासाठी कराड विमानतळावर हजर होते. इस्लामपुरात आल्यावर टाटा यांनी राजारामबापू उद्योग समूहाची व आरआयटीच्या प्रगतीची चित्रफितीद्वारे माहिती घेतली. या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणे, विद्यार्थ्यांची पेटंट याविषयी देखील त्यांनी आस्थेने चौकशी केली. पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या उद्योजकांबरोबर त्यांनी अर्धा तास सविस्तर चर्चा केली. व्यापार्यांच्या शिष्टमंडळाशीदेखील संवाद साधला.
जागतिक कीर्तीचे उद्योजक आणि सामाजिक भान जपणारे रतन टाटा कसे दिसतात, कसे बोलतात याची उत्सुकता असल्याने प्रत्येकजण त्यांना पुढे जाऊन, जवळून पाहायचा प्रयत्न करीत होता. एवढ्या मोठ्या उद्योजकाला ना कुठला मोठा बंदोबस्त, ना पोलिस फौजफाटा, ना संरक्षण. फक्त एका सहायकाबरोबर ते वावरत होते. तत्कालीन मंत्री जयंत पाटील व उद्योगपती भगतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर. डी. सावंत, तत्कालीन प्राचार्य डॉ. सुषमा कुलकर्णी आदींची मंचावर उपस्थिती होती. त्यावेळी त्यांच्याहस्ते कॉलेजच्या इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग विभागाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले होते. नव्या कल्पना, सर्जनशीलता, मूल्यांची जोपासना, कर्तृत्व याद्वारे स्वतःला जगाची ओळख करून द्या, समाजाशी बांधिलकी म्हणून कर्तृत्वाचा ठसा उमटवा, असा सल्लाही त्यांनी उपस्थित अभियंत्यांना दिला होता.
उपजिल्हा रुग्णालयाला 9 कोटींची मदत इस्लामपूर दौर्यावेळी रतन टाटा यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी सुमारे 9 कोटींची आर्थिक मदत केली होती. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरसिंह देशमुख यांनी या निधीतून इमारतीची दुरुस्ती तसेच रंगरंगोटी करून घेतली. तसेच 50 कॉट, 10 आयसीयु बेड, 10 मॉनिटर, दोन डिजिटल एक्स-रे आदी साहित्य घेण्यात आले.
मूल्याधीष्ठित दृष्टिकोन घेऊन भारताला सर्वोच्च स्थानावर पोहोचविण्याचे काम विद्यार्थ्यांची नवी पिढी करेल, असा विश्वास त्यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. देशाला समर्थ व प्रगतीशील बनविण्यासाठी अपयश व निराशेवर मात करा, विद्यार्थी हा संशोधक वृत्तीचा असला पाहिजे, बौद्धिक सामर्थ्य आणि बौद्धिक संपत्ती वृद्धिंगत व्हावी, असे सांगतानाच त्यांनी, उद्योगाशी प्रामाणिक राहा, नावीन्याचा स्वीकार करा, असा संदेश दिला.