

तासगाव शहर : पुढारी वृत्तसेवा: बऱ्याच वर्षांपासून शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली बेदाण्यावरील जीएसटी हटविण्याच्या मागणीला अखेर यश आले. नुकत्याच जैसलमेर येथे झालेल्या बैठकीत बेदाण्याचा समावेश शेतमाल अंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी भाजपा किसान मोर्चाच्यावतीने राज्य सरकार, केंद्रीय कृषिमंत्रालय व अर्थ मंत्रालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता, अशी माहिती किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, द्राक्षावर प्रक्रिया करून अनेक शेतकरी बेदाण्याची निर्मिती करत असतात. मात्र काँगेसच्या काळापासून बेदाणा प्रक्रिया केलेले अन्न या कॅटेगरीमध्ये येत असल्यामुळे आजपर्यंत बेदाण्यावर पाच टक्के व स्टोअरेजमध्ये असणाऱ्या बेदाण्यावर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. मात्र, भाजपा किसान मोर्चाच्या वतीने राज्य सरकार, केंद्रीय कृषिमंत्रालय व अर्थ मंत्रालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन बेदाण्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी लावून धरण्यात आली होती.
हा बेदाणा शेतकरी स्वतः प्रकिया करत असतात. त्यामुळे बेदाण्याला प्रकिया केलेले अन्न ऐवजी शेतमाल संबोधित करण्यात यावे, असा भाजपा किसान मोर्चाचा आग्रह होता. भाजप किसान मोर्चाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस गिड्डे पाटील यांनी हा मुद्दा वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे उचलला होता.
नुकतीच जैसलमेर (राजस्थान) येथे जीएसटी परिषद झाली. या जीएसटी परिषदेमध्ये बेदाणा आता यापुढे शेतमाल म्हणून गणला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बेदाण्यावरील जीएसटी आता करमुक्त झालेला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेषत: सांगली, सोलापूर, धाराशिव, अहमदनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यामध्ये द्राक्षाचे मोठे पीक आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही खूप मोठी भेट प्राप्त झाली आहे. अशी भावना संदीप गिड्डे पाटील यांनी व्यक्त केली.