Political Settlement : राजकारणीच गुन्हेगारांचे पोशिंदे

गुन्हे दाखल न करताच बाहेरच्या बाहेर प्रकरण मिटविण्याचा फंडा
Political Settlement
राजकारणीच गुन्हेगारांचे पोशिंदे
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्ह्यात 11 महिन्यांत 59 खून झाले. तसेच खुनाच्या प्रयत्नाच्या अनेक घटना घडत आहेत. गल्ली-गल्लीत एकमेकांकडे पाहण्यावरून तरुण हिंसक बनून चाकू, कोयत्याने वार करीत आहेत. अशा घटनांमुळे लोक दहशतीखाली आहेत. पोलिसांकडे जाण्याचेही धाडस लोक करीत नाहीत. दुसरे म्हणजे अशी एखादी घटना घडल्यानंतर पोलिस तत्काळ गुन्हे दाखल करून घेत नाहीत. ज्याच्याविरोधात तक्रार आहे, तो आरोपी लगेच आपल्या राजकीय नेत्याला संपर्क करतो. नेते लगेच पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करून गुन्हे दाखल करण्यास मनाई करतात. ‘केस’ बाहेरच्या बाहेर मिटविली जाते. या सर्व प्रकारामुळे गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळत असून, ते पुन्हा गंभीर गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त होतात.

Political Settlement
Sambhajinagar Crime : कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; पीएनबी बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा

सांगली, मिरज व जिल्ह्यात अन्य ठिकाणी झालेल्या खुनाच्या घटना पाहिल्या, तर हे गुन्हेगार कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचे दिसते. सावकारी, दारू विक्री, मटका, छुपा वेश्या व्यवसाय या संबंधित अवैध व्यवसाय गुन्हेगारांकडून सुरू असतात. त्यांचे हफ्तेही ते संबंधितांना पोहोच करीत असतात. त्यामुळे जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत पोलिस कारवाई करीत नाहीत, असे चित्र आहे.

गुन्हेगाराविरोधात तक्रार झाली, राजकीय नेत्यांचा फोन आलाच

शहरात दररोज अनेक गुन्हे घडत आहेत. चोरी, खंडणी, खासगी सावकारीतून अनेकजण पैसे मिळवत आहेत. यातून कोणी पोलिसांकडे तक्रार केली, तर पोलिस ठाण्यात सुरुवातीला कच्ची तक्रार घेतली जाते. त्यानंतर दोन्ही पार्टींना आपापसात मिटविण्यास सांगितले जाते. तोपर्यंत गुन्हेगाराच्या बाजूने संबंधित राजकीय नेत्यांचे ‘पंटर’ पोलिस ठाण्यात आलेले असतात. त्यानंतर फिर्यादीवर ‘दबाव’ आणण्याचे काम सुरू होते. पैसे देऊन केस मिटविण्याचे फंडे सुरू होतात. तरीही फिर्यादी ऐकत नसेल, तर आरोपीच्यावतीने फिर्यादीवर क्रॉस कम्प्लेंट करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे फिर्यादी घाबरून ‘केस’ माघार घेण्याची तयारी दर्शवतो. अशा तर्‍हेने विषय संपविला जातो. परंतु अशा प्रकारामुळे आपले कोणी काही करू शकत नाही, राजकीय लोक सोबतीला असल्याने आपण सहज सुटू शकतो, असा विश्वास गुन्हेगारांना आल्यामुळे ते पुन्हा गुन्हे करण्यास मोकळे होतात.

आमच्या लोकांना अडकविल्यास बदली करेन

सांगली, मिरजेत टोळी युद्धातून अनेक गुन्हे घडत आहेत. एखाद्याचा खून झाला की, त्या घटनेमध्ये अनेक आरोपी अडकलेले असतात. एखादा प्रामाणिक पोलिस अधिकारी या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करतो. त्यानंतर राजकीय नेत्याकडून त्यांना दमबाजी सुरू केली जाते. ‘तुझी बदली करेन, गटचिरोलीला पाठवेन, सोडणार नाही’, अशा प्रकारे त्यांच्यावर दबाव टाकला जातो. त्यामुळे पोलिसही राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास धजावत नसतात. यातूनच गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळून दुसरे गुन्हे करण्यास ते प्रवृत्त होतात.

सावकारी, नशेच्या पदार्थांची विक्री, वेश्या व्यवसाय वाढला

गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी राजकीय नेत्यांचा पोलिसांवर हस्तक्षेप वाढत असल्याचे काही पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. शहरात सावकारी जोमात वाढत आहे. अनेक महिला खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळलेले आहेत. मारामारी, खुनाच्या घटना वाढत आहेत. खुलेआम नेशेच्या पदार्थांची विक्री होत आहे. पानपट्टीतून माव्यामध्ये गांजाचे पाणी टाकून विकले जाते. गांज्याच्या छोट्या-छोट्या पुड्या तयार करून पुरवठा केला जातो. त्याची तरुणांना सवय लावली जाते. काही कॅफे, मसाज पार्लरच्या नावाखाली छुपा वेश्या व्यवसाय केला जातो. बाहेरच्या राज्यातून मुलींची तस्करी करून त्यांची विक्री केली जाते. अशा गोष्टींना मॅनेज करण्यासाठी राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याची चर्चा आहे. पोलिसही राजकीय लोकांच्या दबावामुळे दुर्लक्ष करीत असतात. आणि यातूनच खुनासारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी थांबवायची असेल, तर राजकीय, पोलिसांची ‘मॅनेज’ संस्कृती बंद केली पाहिजे, असा सूर सामाजिक कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

गुन्हेगारी राजकारण्यांना लोकांनीच नाकारावे

हॉटेल्स, बार, सावकारी, अवैध धंदे असणार्‍यांना जर पक्षाने तिकीट दिले, तर सूज्ञ नागरिकांनी त्यांना निवडणुकीत सपशेल नाकारण्याची गरज आहे. अशा गुन्हेगारांना न भीता त्यांना राजकारणापासून दूर ठेवावे, असे आवाहन काही नागरिक करीत आहेत.

गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना तिकीट नाकारावे

राजकारणातून गुन्हेगारी अन् गुन्हेगारीतून पुन्हा राजकारणी बनणे असे सध्या समीकरण झाले आहे. चौकात दादागिरी करणार्‍या, मारामारी करणार्‍या तरुणाला राजकारणी आश्रय देतात. एखाद्याने खून केला असेल, तर राजकारणी त्याच्या पाठीशी राहतात, त्याच्या कुटुंबाला पैसे देऊन त्यांची काळजी घेतात. त्यांचा जामीन करून टोळीत सहभागी करून घेतात. त्या गुन्हेगारांचा आयुष्यभर वापर करून घेतात. राजकीय पक्षांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणुकीचे तिकीटच नाकारले पाहिजे.

गारपीर चौक नशेखोरांचा अड्डा; पोलिस चौकीची गरज

सिव्हिल हॉस्पिटकडून शंभरफुटी रस्त्याकडे जाणार्‍या रस्त्यावरील गारपीर चौक हा नशेखोरांचा अड्डा बनलेला आहे. परिसरात इंदिरानगर झोपडपट्टी आहे. या चौकात रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. दारू, मावा, गांजा अशा नशेच्या पदार्थांची विक्री सुरू असते. या चौकात बसून अनेकजण नशा करीत असतात. अनेक गुन्हेगारांचा वावर या चौकात असतो. या चौकात हॉस्पिटल्स, मेडिकल्स, तसेच सुशिक्षितांची वस्ती आहे. चौकातील गुन्हेगार या व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करीत असल्याने ते त्रस्त झाले आहेत. काही वर्षांपूर्वी या चौकात एका गुंडावर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला होता. त्यामुळे या चौकात पोलिस चौकी व्हावी, अशी मागणी होत आहे.

गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना तिकीट नाकारावे

राजकारणातून गुन्हेगारी अन् गुन्हेगारीतून पुन्हा राजकारणी बनणे असे सध्या समीकरण झाले आहे. चौकात दादागिरी करणार्‍या, मारामारी करणार्‍या तरुणाला राजकारणी आश्रय देतात. एखाद्याने खून केला असेल, तर राजकारणी त्याच्या पाठीशी राहतात, त्याच्या कुटुंबाला पैसे देऊन त्यांची काळजी घेतात. त्यांचा जामीन करून टोळीत सहभागी करून घेतात. त्या गुन्हेगारांचा आयुष्यभर वापर करून घेतात. राजकीय पक्षांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणुकीचे तिकीटच नाकारले पाहिजे.

Political Settlement
Nanded Crime | भावजयीच्या मदतीने लहान भावाने मोठ्या भावाचा केला खून ; प्रेत गोणीत भरून फेकले तलावात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news