

Abuse of a married woman; Crime against PNB Bank manager
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून विवाहित महिलेला जाळ्यात ओढत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या सिडको शाखेतील मॅनेजर दीपक महादू येळणे (३७, रा. संस्कृत व्हिला अपार्टमेंट, जवाहर कॉलनी) याच्याविर-ोधात न्यायालयाच्या आदेशाने दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ ऑगस्ट ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडल्याचे समोर आले आहे.
फिर्यादी २५ वर्षीय विवाहित महिला असून, त्या घरीच ब्युटीपार्लर चालवतात. कुटुंबाच्या आर्थिक स्थितीला हातभार लावण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १० लाख रुपयांच्या कर्जासाठी जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज केला होता. मंजुरीनंतर फाईल पंजाब नॅशनल बँकेच्या सिडको शाखेत पाठवली. सुरुवातीला त्यांना कर्ज मिळाले नाही. नंतर आरोपी दीपक येळणे मॅनेजर म्हणून रुजू झाला. त्याने कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून पीडितेचा व्हॉट्सअॅप नंबर घेतला आणि संवाद सुरू केला.
८ ऑगस्ट २०२४ रोजी त्याने पीडितेला सिडको बसस्थानकाजवळील हॉटेलवर बोलावून कर्ज मंजूर होईपर्यंत माझ्याकडून पैसे घे, नंतर परत कर, असे सांगितले. त्यानंतर समर्थनगर येथील लॉजवर नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने पीडितेच्या खात्यात एक लाख रुपये ट्रान्स्फर केले. पुढे सप्टेंबरमध्ये चिकलठाणा येथील लॉजवर पुन्हा अत्याचार करून ९० हजार रुपये ट्रान्स्फर केले.
ऑक्टोबरमध्ये आरोपीने कर्ज मंजूर झाले, असा खोटा बहाणा करून पीडितेला दौलताबाद येथील एका फार्महाऊसवर नेले. तेथेही अत्याचार केला. संशय आल्याने पीडितेने ओळ-खीच्या व्यक्तीला फोन करून माहिती दिली आणि त्या ठिकाणी आरोपी रंगेहात पकडला गेला. चौकशीत कर्ज मंजूरच नसल्याचे उघड झाले.
बलात्कार प्रकरणातून सुटका मिळवण्यासाठी येळणे यांनी उलट १५ ऑक्टोबर २०२४ रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात पीडितेविरुद्ध खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला, असेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पीएसआय वसंत शेळके करत आहेत.