

Rohit R Patil statements in vita khanapur
विटा : आता आमचा निम्मा संघ स्टेडियमच्या बाहेर बसलाय, निम्मा संघ आत खेळतोय. आतल्या निम्म्या संघाने सब्स्टिट्यूट प्लेयर खेळताहेत, त्यात आम्ही मिसळलो. तर आमचा संघ किती मजबूत येईल, याचा विचार करा, अशी गुगली तासगावचे आमदार रोहित आर पाटील यांनी टाकली.
खानापूर घाटमाथ्यावरील बेणापूर येथील विवेक कृष्णराव शिंदे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत ९३ वा नंबर पटकावून भारतीय पोलीस सेवा (आयपी एस) पद मिळवले. याबद्दल बेनापूर येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार रोहित आर पाटील, आमदार सुहास बाबर, राजाभाऊ शिंदे, सुहास शिंदे, राजन पवार, अनिल शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार पाटील आणि सुहास बाबर यांच्यात राजकीय फटकेबाजी झाली. सुरुवातीला आमदार बाबर यांचे भाषण झाले ते म्हणाले, रोहित दादांचं कसं आहे ? आता आयपीएल सुरू आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा आहे, तो चांगला खेळतोय पण टीम काही जिंकत नाही. तसं रोहित दादांच्या राजकारणाचं झालंय. त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. पण त्यांच्या पक्षाला काय परफॉर्मन्स करता येईना. आमचं त्यांच्याबद्दल मत आहे की "व्हेरी गुड मॅन, बट इन बॅड कंपनी". पण त्यांची एक गोष्ट चांगली आहे, ते पवारांच्या पक्षात आहेत. पण अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे या सगळ्यांबरोबर त्यांचे संबंध चांगले आहेत.
मला असे वाटते की, जर तुम्ही यूपीएससी परीक्षा दिली असती तर ह्या सगळ्या गुणांचा तुम्हाला फायदा झाला असता आणि तुम्ही फार मोठे अधिकारी झाला असता. कारण विरोधात असून सुद्धा ही राजकीय मंडळी हाताळायची कशी ही लकब आर. आर. आबांपेक्षा तुम्हाला जास्त चांगली जमतेय, असे म्हणत बाऊन्सर टाकला. त्यावर आमदार रोहित आर पाटील यांनी सध्याची परिस्थिती काही जरी असली तरी पाच वर्षानंतर फायनल आम्हीच मारणार आहे, असा ठाम विश्वास बोलून दाखवला.
ते म्हणाले की, अनेक लोकांकडून मला शिकायला मिळत आहे. सुहास बाबर आमदार झाल्यानंतर त्यांचे कौतुक करायला कुठल्याच व्यासपीठावर संधी मिळाली नव्हती. एक गोष्ट आहे की, त्यांच्यापेक्षा त्यांच्या पीए (स्वीय सहाय्यका) कडून शिकण्यासारखे जास्त आहे. ही दोघे एवढी हुशार आहेत, मी फक्त ही दोघे मंत्रालयात कुठे जातात, काय मागणी करतात, हेच बघत असतो. ते ज्या डिपार्टमेंटला पत्र देतील, ते जी मागणी करतील , दुसऱ्या दिवशी त्याच आशयाचे माझे पत्र तिथे पोहोचले पाहिजे, एवढी मी काळजी घेत असतो. त्यामुळे इथे जी कामे येतात, ती कामे तिकडे सुद्धा येतात.
फक्त एक मागणी आहे, तुम्ही टेंभूचे पाणी सोडल्यानंतर मग खाली आम्हाला पाणी मिळते. मागील काळात तुमचे थोडे दुर्लक्ष झाले, पण आता पाणी पुढे जाऊ द्या, अशी विनंती करायला इथे घाटावर मी आलो आहे. फार काही बोलणार नाही. दुसऱ्या मतदारसंघात म्हणणार नाही, किमान पाहुण्याकडे तरी पाणी सोडा एवढीच विनंती आपण करीत आहोत, असे म्हणत आमदार सुहास बाबर यांच्याकडे पाहत एकमेकांना सांभाळून जर घेतले, तर चांगले काम या परिसरात होऊ शकते, हे येत्या काळात आम्ही दाखवून देऊ, अशी फिरकी रोहित पाटील यांनी घेतली.