

तासगाव : आमदार रोहित पाटील, नेते आर. आर. पाटील व अन्य नेत्यांचे फोटो व नावाचा वापर करून शासकीय अधिकारी, ठेकेदारांना त्रास देणार्याविरोधात तासगाव पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय हावळे यांनी तक्रार केली आहे. दादासाहेब गोरख चव्हाण (रा. पटवर्धन कुरोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे या संशयिताचे नाव आहे.
दादासाहेब याने आमदार रोहित पाटील, आर. आर. पाटील व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो आर. आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या लेटरहेडवर छापले आहेत. त्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील एका रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने केलेल्या मुरूम-माती, दगड उत्खननाची चौकशी व्हावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हाधिकारी व अन्य शासकीय वरिष्ठ अधिकार्यांकडे केली आहे. चौकशी न झाल्यास मंत्रालयासमोर हलगीवादन व महसूल अधिकार्यांविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. या निवेदनाने आमदार रोहित पाटील व वरिष्ठ नेत्यांची बदनामी झाल्याने याची चौकशी करून कारवाई करावी, असेही हावळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.