

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा : पोलिस असल्याचा धाक दाखवून महाविद्यालयीन विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य करणारा पोलिस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर (वय 37, रा. राजेबागेश्वर, इस्लामपूर) याला दोषी धरून न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यास 29 हजार रुपये दंडाचा आदेश दिला. प्रथमवर्ग न्यायाधीश हेमंत पांचोली यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. अनैसर्गिक कृत्याचा हा प्रकार अडीच वर्षापूर्वी घडला होता.
पीडित विद्यार्थी शिक्षणासाठी इस्लामपूर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहात होता. तो 27 ऑक्टोबर 2021 रोजी मैत्रिणीला भेटायला गेला होता. तिला भेटून पहाटे खोलीकडे जात होता. त्यावेळी रात्र गस्तीवरील पोलिस हणमंतने त्याला अडवले. आत्ता तु कोठुन आलास इथे काय करतो असे विचारले. त्यावेळी विद्यार्थ्याने सर्व माहिती सांगितली. त्याने त्याचा मोबाईल नंबर घेतला.
29 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजण्याच्या सुमारास त्याने विद्यार्थ्याला बोलावून घेतले. मला पैसे दिले नाहीस तर मी तुझ्या व तुझ्या मैत्रीणीच्या घरच्यांना प्रेम प्रकरणाबद्दल सांगेन, अशी धमकी दिली. विद्यार्थ्याने मित्राकडून पैसे घेऊन त्याला दिले. यानंतर ‘मैत्रीणीचा क्रमांक दे आणि मला शरीरसुख देण्यास तिला सांग’, अशी मागणी त्याने केली. त्यास त्याने नकार दिला. हणमंत हा विद्यार्थ्याला घेऊन खोलीवर गेला. त्याला दमदाटी करून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्याचे मोबाईल वर चित्रीकरण केले.
21 नोव्हेंबर रोजी हणमंतने मोबाईल वरून विद्यार्थ्याशी पुन्हा संपर्क साधला. त्याला भेटायला बोलावून अनैसर्गिक कृत्याची मागणी केली. हणमंतने विद्यार्थ्याला व्हिडिओ दाखवला. तो व्हायरल करण्याची धमकी दिली. विद्यार्थ्याने संध्याकाळी भेटू असे सांगून तेथून पळ काढला. विद्यार्थ्याने घडलेला प्रकार त्याच्या मित्राला सांगितला. त्यानंतर दोघांनी इस्लामपूर पोलिस ठाणे गाठले. गुन्हा नोंद करून पोलिसाला निलंबीत केले. त्याची रवानगी कारागृहात केली होती.
या खटल्यात 18 साक्षीदार तपासले. पीडित विद्यार्थी, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पीडित विद्यार्थ्याचे मित्र यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षातर्फे अॅड. बी. एस. मोरे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षास पोलिस संदीप शेटे यांनी मदत केली.