

पलूस : येथे बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरणार्या कांचन बाबुराव कुंभार (रा. वाझर, ता. खानापूर) या चोरट्यास पलूस पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अरविंद श्रीमंत यमगर (रा. पलूस) हे शुक्रवार, दि. 18 रोजी सकाळी 11 वाजता घर बंद करून पंढरपूर येथे गेले होते. ते सोमवार, दि. 21 रोजी परत आले असता त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता कपाटातील सुमारे 3 लाख 50 हजार किमतीचे सोन्याचे दागिने व 50 हजार रोख रक्कम, असा एकूण 4 लाखांचा ऐवज चोरीस गेलेला होता.
याप्रकरणी पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सखोल चौकशीद्वारे कांचन कुंभार याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेला पूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कारवाईत पोलिस अंमलदार गणेश सुतार, जितीन यादव, शशिकांत मातक, गणेश तापकीर, भरत वडवळ यांनी सहभाग घेतला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारकुळे, उपविभागीय अधिकारी तानाजी थोरात यांनी तपास पथकाचे कौतुक केले.