

Islampur gangster murder incident
इस्लामपूर : येथील कुविख्यात गुंड नितीन संजय पालकर (वय ३५ ) याचा दोन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला. गुरुवारी (दि.२४) भरदिवसा येथील वाळवा बझारसमोर घडलेल्या या थरारक घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे. पालकर याच्यावर खून, खूनाचे प्रयत्न, खंडणी, हाणामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला मोक्काही लावण्यात आला आहे. तो सध्या जामिनावर बाहेर होता.
याबाबत पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, गुरुवारी दुपारी येथील वाळवा बझार जवळ असलेल्या एका पानटपरीसमोर पालकर याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गुरुवार हा बाजाराचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ होती. भर रस्त्यात रहदारीच्या ठिकाणीच हा हल्ला झाल्याने एकच आरडा ओरड झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पालकर याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
खूनाची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय हारुगडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांना सूचना केल्या. दोघा हल्लेखोरांनी हा खून केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हल्लेखोरांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. याच वाळवा बझार परिसरात यापूर्वी खूनाच्या तीन घटना घडल्या आहेत. पालकर याच्या खूनामुळे शहरात खळबळ माजली आहे.