

इस्लामपूर : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून डोक्यात बेसबॉल स्टीकने मारहाण करून युवकाचा खून करण्यात आला. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. सौरभ राजेंद्र केर्लेकर (वय 30, रा. माळगल्ली, इस्लामपूर) असे मृताचे नाव आहे. खूनप्रकरणी अरविंद ऊर्फ राघू सुभाष साठम (32 रा. शिवनगर, इस्लामपूर), त्याचा साथीदार किरण रामचंद्र सातपुते (35, मूळ रा. रेड, ता. शिराळा, सध्या रा. संभुआप्पा मठाजवळ, इस्लामपूर) या संशयितांना इस्लामपूर पोलिसांच्या पथकाने 12 तासांच्या आत जेरबंद केले. दोघांना आज, गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
हारुगडे म्हणाले, बुधवारी पहाटे व्यायामाला गेलेल्या नागरिकांना वाघवाडी फाट्यावरील ओपन जिमजवळ युवकाचा मृतदेह दिसला. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या डोक्यात, तोंडावर मारहाण झाली होती. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी माहिती घेतली असता हा मृतदेह येथील माळगल्लीतील डीजे ऑपरेटर सौरभ केर्लेकर याचा असल्याचे समोर आले.
राघू याने बुधवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास वाघवाडी फाट्यावर सौरभ याला बोलावून घेतले. तो दुचाकीवरून तेथे गेला. हॉटेलबाहेर राघू, किरण व सौरभ यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यावेळी राघू याने त्याच्याकडील बेसबॉल स्टिकने सौरभ याच्या तोंडावर, डोक्यात मारहाण केली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर संशयित राघू घरी निघून गेला, तर किरण हा हॉटेलमध्ये झोपण्यासाठी गेला. सकाळी रघू, किरण यांना वाघवाडी येथे युवकाचा खून झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी पलायन केले.
राघू याची पत्नी व सौरभ हे नातेवाईक आहेत. सौरभ याचे राघू याच्या घरी येणे-जाणे होते. सौरभ याचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा राग राघू याच्या मनात होता. सौरभ हा राघू याच्या पत्नीला त्रास देत होता. राघू हा वाघवाडी फाट्यावरील एका हॉटेलमध्ये कामाला आहे. तेथे कामाला असलेल्या किरण याच्याशी त्याची मैत्री आहे.