

आटपाडी : पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी तर्फे देण्यात येणारा ‘पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार २०२५’ प्रतिष्ठित साहित्यिक, ज्येष्ठ कवी व गझलकार सुधाकर इनामदार (गोमेवाडी) यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्कारामुळे माणदेश व आटपाडी तालुक्याच्या साहित्य परंपरेला आणखी एक अभिमानाचा मुकुट लाभला आहे. मराठी कवितेच्या, विशेषतः गझल साहित्याच्या क्षेत्रात इनामदार यांनी लक्षणीय योगदान दिले आहे. ‘जागर’, ‘माझे दगडाचे हात’ हे त्यांचे कवितासंग्रह तर ‘इजांची मखमल’, ‘झरे काही छरे काही’ आणि ‘मी चंदन व्हाया बघतो’ हे गझलसंग्रह विशेष लोकप्रिय ठरले आहेत.
साखर उद्योगात कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या साहित्यिक जाणीवेची आणि प्रतिभेची जोपासना केली. त्यांच्या गझला महाराष्ट्रभर गाजल्या असून अ.भा. मराठी साहित्य संमेलनातील गझल संमेलनात तसेच स्वतंत्र अ.भा. मराठी गझल संमेलनात त्यांना अनेक वेळा निमंत्रित करण्यात आले आहे.
यापूर्वी त्यांना ग.दि. माडगूळकर उत्कृष्ट काव्यरत्न पुरस्कार, पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार, शहाबाई यादव गौरव पुरस्कार आणि प्रतिष्ठा साहित्यरत्न पुरस्कार असे विविध राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाले आहेत. “माझ्यासारख्या साखर कारखान्यात काम करणाऱ्या कवीस हा सन्मान जाहीर झाला, ही आनंदाची बाब आहे. मात्र, प्रत्येक पुरस्कारासोबत जबाबदारीची जाणीवही अधिक दृढ होते,” अशा भावना सुधाकर इनामदार यांनी व्यक्त केल्या