ज्‍येष्‍ठ कवी नारायण सुर्वे यांच्‍या जयंतीनिमित्त त्‍यांच्‍या कविता

Published on
Updated on

मुंबई :  पुढारी ऑनलाईन 

"एकटाच आलो नाही युगाची साथ आहे

 सावध असा तुफानाची हीच सुरूवात आहे. 

 कामगार आहे मी तळपती तलवार आहे.

सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा करणार आहे." 

असे म्हणत मार्क्सवाद हाताशी धरून मराठी कवितेला स्वप्नरंजनातून बाहेर काढून वास्तववादी बनविण्याचे काम ज्‍येष्‍ठ कवी नारायण सुर्वे यांनी केले. मराठी साहित्यात दलित- शोषितांच्या वेदनेला स्थान मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. त्यांच्या कविता कामगार जाणिवेन भारलेल्या, साम्यवादी  राजकीय बांधिलकी मानणार्‍या आहेत. आज १५ ऑक्टोबर ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे यांच्‍या जयंतीनिमित्त त्‍यांच्‍या काही निवडक कविता….

१. दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले

हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

२. इतका वाईट नाही मी..

इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस

दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस

तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले

आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले

हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस

हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस

कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद

पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद.

अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको

आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव.

ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.

३.माझी आई 

जेव्हा तारे विझू लागत

उंच भोंगे वाजू लागत

पोंग्याच्या दिशेने वळत

रोज दिंड्या जात चालत

झपाझप उचलीत पाय

मागे वळून बघीत जाय

ममतेने जाई सांगत

नका बसू कुणाशी भांडत

वर दोन पैसे मिळत.

दसऱ्याच्या आदल्या दिनी

जाई पाचांसह घेऊनी

फिरू आम्ही आरास बघत

साऱ्या खात्यांतून हुंदडत

किती मजा म्हणून सांगू

शब्दासाठे झालेत पंगू

भिंगऱ्या पेपेटे घेऊन

फुग्यांचे पतंग झोकून

जात असू पक्षी होऊन.

एक दिवस काय झाले

तिला गाडीतून आणले

होते तिचे उघडे डोळे

तोंडातून रक्त भळभळे

जोडीवालीण तिची साळू

जवळ घेत म्हणाली बाळू

मिटीमिटी पाहात होतो

माझे छत्र शोधीत होतो

आम्ही आई शोधीत होतो.

त्याच रात्री आम्ही पांचानी

एकमेकास बिलगूनी

आईची मायाच समजून

घेतली चादर ओढून

आधीचे नव्हतेच काही

आता आई देखील नाही

अश्रूंना घालीत अडसर

जागत होतो रात्रभर

झालो पुरते कलंदर.

४.माझे विद्यापीठ

ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती

दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती.

अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची ऊठबस करता करता….

टोपलीखाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता.

मोजलेत सर्व खांब ह्या रस्त्यांचे, वाचली पाट्यांवरची बाराखडी

व्यवहाराच्या वजाबाकीत पाहिलेत; हातचे राखून कित्येक मारलेले गडी.

हे जातीजातींत बाटलेले वाडे, वस्त्या, दारावरचे तांबडे नंबरी दिवे

सायंकाळी मध्यभागी असलेल्या चिडियाघराभोवती घोटाळणारे गोंगाटांचे थवे.

अशा तांबलेल्या, भाकरीसाठी करपलेल्या, उदास वांदेवाडीच्या वस्तीत

टांगे येत होते, घोडे लोळण घेत होते, उभा होतो नालीचा खोका सांभाळीत.

"ले, पकड रस्सी-हां-खेच, डरता है? क्या बम्मनका बेटा है रे तू साले

मजदूर है अपन; पकड घोडे को; हां; यह, वाह रे मेरे छोटे नालवाले."

याकुब नालबंदवाला हसे, गडगडे. पत्रीवाला घोडा धूळ झटकीत उभा होई

"अपनेको कालाकांडी. तेरेको जलेबी खा." म्हणत दुसरा अश्व लोळवला जाई.

याकुब मेला दंग्यात, नव्हते नाते; तरीही माझ्या डोळ्याचे पाणी खळले नाही

उचलले नाही प्रेत तेव्हा 'मिलाद-कलमा';च्या गजरात मिसळल्याशिवाय राहिलो नाही.

त्याच दिवशी मनाच्या एका को-या पानावर लिहले, "हे नारायणा"

अशा नंग्याच्या दुनियेत चालायची वाट; लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा."

भेटला हरेक रंगात माणूस, पिता, मित्र, कधी नागवणारा होईन

रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत पायाचे तळवे होरपळवून.

तरी का कोण जाणे ! माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही

आयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने; वाटते, अजून काही पाहिलेच नाही,

नाही सापडला खरा माणूस; मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो ?

सदंतीस जिने चढून उतरताना, मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो ?

आयुष्य दिसायला पुस्तकाच्या कव्हरासारखे गोंडस, गुटगुटीत, बाळसेदार.

आतः खाटकाने हारीने मांडावीत सोललेली धडे, असे ओळीवर टांगलेले उच्चार

जीवनाचा अर्थ दरेक सांगीत मिटवत जातो स्वतःला स्वतःच्याच कोशात

पेन्शनरासारख्या स्मृती उजाळीत उगीचच हिंडतो कधी वाळूत कधी रामबागेत

हे सगळे पाहून आजही वाटते, "हे नारायणा, आपण कसे हेलकावतच राहिलो.'

चुकचुकतो कधी जीव; वाटते, ह्या युगाच्या हातून नाहकच मारले गेलो.

थोडासा रक्ताला हुकूम करायचा होता, का आवरला म्यानावरचा हात,

का नाही घेतले झोकवून स्वतःला, जसे झोकतो फायरमन फावडे इंजिनात.

विचार करतो गतगोष्टींचा, काजळी कुरतडीत जणू जळत राहावा दिवा एक

उध्वस्त नगरात काहीसे हरवलेले शोधीत हिंडावा परतलेला सैनिक.

किती वाचलेत चेहरे, किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात

इथे सत्य एक अनुभव, बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात.

खूप सोयरीक करोत आता ग्रंथाची; वाटते तेही आपणासारखेच बाटगे निघाले

हवे होते थोडे परिचारिकेसम, कामगारासम निर्मितिक्षम. पण दुबळेच निघाले.

जगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते; भरताना तेही बापडे दडतील

स्ट्रेचर धरून पोशाखी शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील.

वाढले म्हणतात पृथ्वीचे वय, संस्कृतीचेही; फक्त वयेच वाढत गेली सर्वांची

छान झाले; आम्हीही वाढतो आहोत नकाशावर. गफलत खपवीत जुळा-यांची.

ह्या कथाः कढ आलेल्या भाताने अलगद झाकण उचलावे तसा उचलतात

रात्रभर उबळणा-या अस्थम्यासारख्या अख्खा जीव हल्लक करुन सोडतात.

कळले नाहीः तेव्हा याकुब का मेला ? का मणामणाच्या खोड्यात आफ्रिकन कोंडला ?

का चंद्राच्या पुढ्यातला एकुलता पोर युध्दाच्या गिधाडाने अल्लद उचलला ?

चंद्रा नायकीण; शेजारीण, केसांत कापसाचे पुंजके माळून घराकडे परतणारी

पंखे काढलेल्या केसांवरुन कापसाखळीची सोनसरी झुलपावरुन झुलणारी

अनपड. रोजच विकत घेऊ पेपर, रोजच कंदिलाच्या उजेडात वाचायची सक्ती होई

"खडे आसा रे माझो झील; ह्या मेरेर का त्या रे," भक्तिभावाने विचारीत जाई.

कितीतरी नकाशांचे कपटे कापून ठेवले होते तिने, ; जगाचा भूगोल होता जवळ

भिरभिरायची स्टेशनांच्या फलाटावरुन, बराकीवरुन , मलाच कुशीत ओढी जवळ.

मेली ती; अश्रूंचे दगड झालेत. चटके शांतवून कोडगे झाले आहे मन

बसतो त्यांच्या पायरीवर जाऊन, जसे ऊन. ऊठताना ऊठवत नाही नाती सोडून.

निळ्या छताखाली नांगरुन ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी

दुखत होत्या खलाशांच्या माल चढवून उतरुन पाठी

वरुन शिव्यांचा कचकोल उडे, " सिव्वर, इंडियन, काले कुत्ते."

हसता हसता रुंद होत गो-या मडमांच्या तोंडाचे खलबते

आफ्रिकी चाचा चिडे, थुंके, म्हणे; "काम नही करेगा."

चिलमीवर काडी पटवीत मी विचारी, "चाचा, पेट कैसा भरेगा ?"

धुसफुसे तो, पोट-या ताठ होत, भराभरा भरी रेलच्या वाघिणी

एक दिवस काय झाले; त्याच्या डोळयात पेटले विद्रोहाचे पाणी

टरकावले घामेजले खमीस, त्याच्या क्रेनवर बावटा फडफडला

अडकवून तिथेच देह माझा गुरु पहिले वाक्य बोलला,

"हमारा खून झिंदाबाद !" वाटले, चाचाने उलथलाच पृथ्वीगोलट

खळालल्या नसानसांत लाटास कानांनी झेलले उत्थानाचे बोल

अडकवून साखळदंडात सिंह सोजिरांनी बोटीवर चढवला

"बेटा! " गदगदला कंठ. एक अश्रू खमीसावर तुटून पडला.

कुठे असेल माझा गुरु, कोणत्या खंदकात, का ? बंडवाला बंदीशाळेत

अजून आठवतो आफ्रिकन चाचाचा पाठीवरुन फिरलेला हात

आता आलोच आहे जगात, वावरतो आहे ह्या उघड्यानागड्या वास्तवात

जगायलाच हवे; आपलेसे करायलाच हवे; कधी दोन घेत; कधी दोन देत

५.तेव्हा एक कर!

जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन

तेव्हा एक कर

तू निःशंकपणे डोळे पूस.

ठीकच आहे चार दिवस-

उर धपापेल, जीव गुदमरेल.

उतू जणारे हुंदके आवर,

कढ आवर.

उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस

खुशाल, खुशाल तुला आवदेल असे एक घर कर

मला स्मरून कर,

हवे अत्र मला विस्मरून कर.

६.बेतून दिलेले आयुष्य

बेतून दिलेले आयुष्य; जन्मलो तेव्हा-

प्रकाशही तसाच बेतलेला

बेतलेलेच बोलणे बोललो. कुरकुरत

बेतलेल्याच रस्त्याने चाललो; परतलो

बेतल्या खोलीत ; बेतलेलेच जगलो

म्हणतात ! बेतलेल्याच रस्त्याने गेलात तर

स्वर्ग मिळेल. बेतलेल्याच चार खांबात


 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news