Municipal Ward Draft Structure | प्रारूप प्रभाग रचना आज होणार प्रसिद्ध
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना बुधवार, दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध होणार आहे. महापालिकेचे संकेतस्थळ, महापालिका मुख्यालय तसेच प्रभाग समिती क्रमांक 1, 2, 3 आणि 4 कार्यालयात प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा आणि नकाशे प्रसिद्ध होणार आहेत. प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना व हरकती दि. 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत महापालिकेकडे सादर करता येणार आहेत, अशी माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम दि. 10 जून 2025 च्या शासन निर्णयानुसार सुरू झाले. महापालिका प्रशासनाने 2011 च्या जनगणनेनुसार प्रारूप प्रभाग रचना तयार केली. त्याचा प्रस्ताव दि. 12 ऑगस्ट रोजी नगरविकास विभागाला सादर केला. तिथून तो राज्य निवडणूक आयोगाला सादर झाला. राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑगस्ट 2025 रोजी प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानुसार आता प्रारूप प्रभाग रचना दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, 1 जुलै 2025 च्या मतदारयादीत जे आहेत, ते महापालिका निवडणुकीसाठी मतदार असतील, असेही आयुक्त गांधी यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त अश्विनी पाटील उपस्थित होत्या.
सूचना, हरकतींसाठी मुदतवाढ
प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना, हरकतींसाठी दि. 3 ते 8 सप्टेंबर हा कालावधी होता. मात्र दि. 5 ते 7 सप्टेंबरपर्यंत सुटी आहे. त्यामुळे सूचना, हरकतींसाठी मुदतवाढ मिळाली आहे. सूचना, हरकती सादर करण्याचा कालावधी बुधवार, दि. 3 सप्टेंबर ते सोमवार दि. 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. महापालिका मुख्यालयातील निवडणूक कार्यालय कक्ष अथवा संबंधित प्रभाग समिती क्रमांक 1, 2, 3, 4 कार्यालय येथे सूचना, हरकती सादर करता येणार आहेत.
प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल सूचना, हरकतींवर सुनावणीसाठी 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर हा कालावधी आहे. जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी सुनावणी घेणार आहे. सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकारी यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना नगरविकास विभागास सादर होईल. त्यानंतर ती राज्य निवडणूक आयोगास सादर होईल. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिल्यानंतर अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध होईल.
प्रभाग 20, सदस्य 78..!
प्रारूप प्रभाग रचना, प्रभागातील सदस्य संख्या याबाबतची सर्व माहिती महापालिका प्रशासनाने गोपनीय ठेवली आहे. मात्र जाणकारांच्यामते महापालिकेची 2025 ची निवडणूक ही 2018 च्या निवडणुकीप्रमाणे 4 सदस्सीय प्रभागानुसार आणि 27 टक्के ओबीसी आरक्षणानुसार होईल. त्यामुळे 2018 च्या निवडणुकीतील प्रभाग रचनाच 2025 च्या निवडणुकीत राहील. निवडून द्यायच्या सदस्यांची संख्याही 78 इतकीच असेल. तरीही प्रारूप प्रभाग रचना कशी असेल, याबाबत

