अनेक देशात मंकीपॉक्स या विषाणुजन्य आजाराचा संसर्ग वाढत आहे. जिल्ह्यात सध्या या आजाराचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र सतर्क राहावे, काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी केले आहे. ते म्हणाले, शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी जिल्ह्यात आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मंकीपॉक्स हा एक विषाणुजन्य आजार आहे. 1970 मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो इथे आढळला. हा आजार ऑर्थोपॉक्स व्हायरस या डी.एन.ए. प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी विषाणूचा नैसर्गिक स्रोत आहेत.
ताप, डोकेदुखी, अंगदुखी, लसिका ग्रंथीना सूज (कानातील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथींना सूज येणे), थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे, खोकला, शरीरावर अचानक रॅश, पुरळ उठणे, अशी लक्षणे आहेत.
सर्वसाधारणपणे मंकीपॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार आहे. रुग्ण 2 ते 4 आठवड्यात बरा होतो. लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुणांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. आजाराचा मृत्यू दर सर्वसाधारणपणे 3 ते 6 टक्के आहे. कुपोषण, कृमी प्रादुर्भाव आणि प्रतिकार शक्ती कमी असलेल्या समुदायामध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे, रुग्णाच्या कपड्यांची अथवा अंथरुण-पांघरुणाशी संपर्क येऊ न देणे, हातांची स्वच्छता ठेवणे.
मंकीपॉक्स रुग्णाला विशेष उपचारांची गरज भासत नाही. ‘डब्ल्यूएचओ’नुसार लक्षणे पाहून ताप व वेदनेवरील औषधे देण्याचा सल्ला दिला जातो. एखाद्या रुग्णाची प्रतिकारशक्ती चांगली असेल आणि त्याला त्वचेसंबंधी काही आजार नसतील, तर कोणत्याही उपचाराविना रुग्ण बरा होऊ शकतो. फक्त काळजी घेण्याची गरज आहे, अशी माहिती डॉ. वाघ यांनी दिली.
माणसांपासून माणसाला होणारी लागण : थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, अप्रत्यक्ष संपर्क : बाधीत व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत, जर खूप वेळ बाधीत व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसनमार्गातून बाहेर पडणार्या मोठ्या थेंबावाटे. प्राण्यांपासून माणसाला लागण : बाधीत प्राणी चावल्यामुळे किंवा बाधीत प्राण्यांचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.