

तासगाव : बेदाणा उधळणीसह विविध विषयांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी मांडलेली भूमिका आणि त्यासंदर्भात सुरू असलेले उपोषण योग्यच आहे. शेतकरी हितासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे सांगून आमदार रोहित पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन बाजार समिती संचालक आणि प्रशासनाला सर्व मागण्या मान्य करायला लावल्या. तसेच विनंती करून काळे यांचे उपोषण सोडवले.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्यादरम्यान होणारी बेदाण्याची उधळण, शेतकऱ्यांच्या मालातील तूट, पेमेंटला होणारा विलंब आणि इतर विविध प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी सिद्धेश्वर चौकात सुरू केलेले आमरण उपोषण गुरुवारी सायंकाळी आमदार रोहित पाटील यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले. या वेळी बाजार समितीच्या वतीने मागण्या मान्य केल्याचे अधिकृत पत्र आमदार पाटील यांच्या हस्ते काळे यांना देण्यात आले. या प्रसंगी बाजार समितीचे सभापती युवराज पाटील, सचिव चंद्रकांत कणसे, माजी सभापती रवींद्र पाटील, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन अमोल पाटील आणि माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, अमोल काळे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. त्यांची भूमिका शेतकरीहिताची असल्याने बाजार समितीचे सभापती व संचालकांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करून या प्रश्नांवर मार्ग काढला आहे. तासगावच्या बेदाणा बाजारपेठेत राज्यासह परराज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर आवक होते. त्यामुळे बाजारपेठेवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी उपोषण मागे घेण्याची विनंती केली व त्यांनी ती मान्य केली. बाजार समितीने दिलेली आश्वासने पाळलीच पाहिजेत. अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.