

Suhas Babar on Local Body Election
विटा : विरोधकांकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आपण विचार करू, असे सांगत आमदार सुहास बाबर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वेगळाच ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आज (दि.१) विट्यातील विविध विकास कामांच्या मंजुरीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, माजी नगरसेवक कृष्णत गायकवाड, माजी नगराध्यक्ष नंदू पाटील, माजी नगरसेवक अमर शितोळे, रणजीत पाटील, शहरप्रमुख राजू जाधव, विनोद गुळवणी, उत्तम चोथे, वैभव म्हेत्रे आदी उप स्थित होते.
यावेळी आगामी नगरपालिका निवडणुकीबाबत विचारले असता आमदार बाबर म्हणाले, आमचे सत्तावीस उमेदवार तयार आहेत. निवडणुकीची तयारीही पूर्ण झाली आहे. आपण विधानसभा निवडणुकी वेळी सांगत होतो, की चेहरा बघितला की कळतं, की लोक कुणाला मतदान करणार. त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते, चार हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल आणि प्रत्यक्षात चार हजार दोनशेचे मिळाले.
विट्यातील लोकांचा निर्णय झालाय. आता नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला आरक्षण पडलंय. त्यामुळे ना बाबरांच्या कुटुंबातील सदस्य, ना पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य. विट्याच्या सर्वसामान्य घरातील एखादी महिला भगिनी उमेदवार नगराध्यक्ष होईल. त्यामुळे ती संधी लोक आम्हाला देतील, याचा आपल्याला पूर्ण विश्वास आहे. आम्ही कोणाचे तरी घर राजकारणातून संपवावे, किंवा कोणालातरी शह द्यायचा आहे, म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही.
तर जे शब्द आम्ही विटेकर जनतेला विधानसभा निवडणुकीत दिले होते, आम्ही विकासकामांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण केले. भविष्यात या शहरासाठी काय करायचे, ते काम घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत. आम्हाला विश्वास आहे, की लोक आम्हालाच साथ देतील. जिथे शक्य तिथे युती करून लढा, असे महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत छेडले असता, शक्य तिथे या शब्दाला अंडरलाईन करा, असे सांगत आमदार बाबर यांनी स्वतंत्र लढतीचे संकेत दिले.
मात्र, तरीही विरोधकांकडून सन्मानजनक प्रस्ताव आला, तर आपण विचार करू, असे सांगत आमदार बाबर म्हणाले, विधानसभेचा आमदार कोण आहे?, विट्यात विधानसभेला शहरामध्ये कोणाला मताधिक्य आहे, याचा विचार करून प्रस्ताव आल्यास आपणही विचार करू, अशी गुगली टाकत आमदार बाबर यांनी निवडणुकी त ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला आहे.