

सांगली : टाकळी (ता. मिरज) येथील उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेचा खून झाल्याचे आता समोर आले आहे. चारित्र्य आणि पत्नीकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला वैतागून दुसऱ्या पतीने वडिलांच्या मदतीने हा खून केला आहे. नीतू ऊर्फ शालिनी आकाश यादव (वय 37, रा. उत्तर प्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या खूनप्रकरणी तिचा दुसरा पती आकाश ऊर्फ विशाल दीनदयाळ यादव (वय 24) आणि सासरा दीनदयाळ रामबाली यादव (वय 55, दोघे रा. खुज्झी, चन्दवक, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.
टाकळी येथे 23 डिसेंबर 2025 रोजी छिन्नविछिन्न अवस्थेत, चेहरा आणि धड प्राण्याने खाल्लेला मृतदेह मिळून आला होता. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात महिलेच्या आकस्मिक मृत्यूची नोंद होती. मृतदेहाचा चेहरा आणि धड नसल्याने तिची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. महिलेच्या खुनाच्यादृष्टीने तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पोवार यांचे पथक तपास करीत होते.
महिलेची कोणतीही ओळख पटत नसल्याने तांत्रिकदृष्ट्या या खुनाचा तपास सुरू करण्यात आला होता. पथकातील संकेत मगदूम आणि इम्रान मुल्ला या दोघांना घटनास्थळी पुणे ते मिरज रेल्वेचे तिकीट आणि दोन मोबाईल नंबरचे लोकेशन मिळून आले. त्यानंतर तातडीने मिरज रेल्वे स्थानक येथे चौकशी केली असता, ते तिकीट कोयना एक्स्प्रेसचे असल्याचे व 16 डिसेंबर रोजी पुणे स्थानकातून काढले असल्याचे समोर आले. यावेळी घटनास्थळी मिळालेली महिलेची साडी आणि शॉलच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. मिरज रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला असता, त्या रंगाची साडी आणि शॉल घेतलेली महिला रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असल्याचे दिसून आले. तसेच ते एका रिक्षातून गेल्याचे समोर आले. यादरम्यान आकाश ऊर्फ विशाल याने पैसे संपल्याने मिरज स्थानकाबाहेर चिक्की विकणाऱ्या विक्रेत्याच्या खात्यावर नातेवाईकांकडून 3 हजार रुपये घेतले होते. पोलिसांनी रिक्षाचालक आणि चिक्की विक्रेत्याकडे चौकशी केली, त्यावेळी रिक्षा चालकाने टाकळी येथील ओढ्याजवळ तिघांना सोडल्याची व त्यांच्यात वादावादी झाल्याचे सांगितले.
घटनास्थळी मिळालेले दोन मोबाईल क्रमांक आणि चिक्की विक्रेत्याच्या पैसे आलेल्या खात्याची चौकशी केली असता, एक क्रमांक चंदादेवी दीनदयाळ यादव, तर दुसरा क्रमांक दीनदयाळ यादव यांच्यानावे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणची दोन वेगवेगळी पथके हरियाणा आणि उत्तर प्रदेशकडे रवाना करण्यात आली. मृत नीतू ऊर्फ शालिनी यादव हिचा दुसरा पती आकाश ऊर्फ विशाल याला हरियाणामधील रोहतक येथून, तर सासरा दीनदयाळ यादव याला उत्तर प्रदेश येथील खुज्झी येथून अटक करण्यात आली. दोघांनी नीतू हिच्या खुनाची कबुली दिली आहे.
कौटुंबिक वादातून नीतू हिने कुटुंबाविरुद्ध चंन्दवक पोलिस ठाण्यात शारीरिक, मानसिक त्रास दिला जात असल्याबाबतची तक्रार दिली होती. याचा राग आकाश याच्या मनात होता. यातून त्याने तिच्यासोबत वाद मिटवून घेतला होता. तसेच इतरत्र राहण्यास जाऊ, असे सांगून वडील दीनदयाळ यांच्यासोबत तिला मिरज तालुक्यातील टाकळी येथे आणले होते. या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा जोरदार वादीवादीचा प्रकार घडला. त्यानंतर उसाच्या शेतात नेऊन तिचा शॉलच्या मदतीने गळा आवळून खून केला व पुन्हा रेल्वेने उत्तर प्रदेशमधील जैनपूर येथे गेल्याची कबुली त्याने दिली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या बनलेल्या या खुनाचा आठ दिवसात छडा लावण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले.
या गुन्ह्यात पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, मिरज ग्रामीणचे निरीक्षक अजित सीद, उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पोवार, रणजित तिप्पे, हवालदार संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, प्रमोद साखरपे, सुशील मस्के, श्रीधर बागडी, रूपेश होळकर, सुमित सूर्यवंशी, अतुल माने, रणजित जाधव, गणेश शिंदे, सुनील देशमुख, अभिजित पाटील, अजय पाटील यांनी सहभाग घेतला.
खुनासाठी टाकळीच का?
आकाश आणि त्याचे वडील दीनदयाळ हे दोघे जनावरांची देखभाल करण्याचे काम करतात. आकाश हा टाकळीमधील एका गोठ्यात काम करीत होता. त्यामुळे त्याला या परिसराची माहिती होती. त्यामुळे त्याने खुनासाठी टाकळी गावाची निवड केली होती.
रेल्वे तिकीट अन् मोबाईल क्रमांक
घटनास्थळी पोलिसांना कोयना एक्स्प्रेसचे तिकीट आणि दोन मोबाईल क्रमांकाचे लोकेशन मिळून आले होते. याआधारेच या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले होते. त्यामुळे महिलेची ओळख पटलेली नसतानाही, केवळ रेल्वे तिकीट आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे या खुनाचा छडा लावण्यात आला आहे.
मित्राच्या मदतीने आकाश आणि नीतूची ओळख
आकाश आणि नीतूची ओळख त्यांच्या मित्राच्या मदतीने झाली होती. आकाश हा जनावरांची देखभाल करण्याचे काम करतो. तो हैदराबादमध्ये जनावरांची देखभाल करीत असताना, एका मित्राच्या मदतीने त्याची नीतूसोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले. दोघांची पहिली भेट उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे झाली होती. त्यानंतर त्यांनी मंदिरात विवाह केला होता.
खून करून रेल्वेने उत्तर प्रदेशकडे पलायन
16 डिसेंबर 2025 रोजी तिघे पुण्यातून कोयना एक्स्प्रेसने मिरजेत आले होते. त्यानंतर तिघे रिक्षातून टाकळीत गेले. तिथे नीतूचा खून करून बाप-लेक पुन्हा मिरज स्थानकात आले. त्यानंतर त्यांनी रेल्वेने पुन्हा वाराणसी गाठले होते. त्यानंतर तेथे दोघे वेगवेगळे होत आकाश ऊर्फ विशाल हा हरियाणामधील रोहतक येथे गेला, तर दीनदयाळ हा खुज्झी या मूळ गावी गेला होता.