

नाशिक : गुंतवणूक केल्यास जादा नफा कमावण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्यासह ४ जणांनी एकास ७५ लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिलिंद गाढवे, पत्नी प्रियंका गाढवे, तिचा भाऊ अर्जुन पाटील, नीलेश व हेमंत जंगम यांनी फिर्यादीशी संपर्क साधला. फिर्यादीचा विश्वास मिळवत फिर्यादीला ऑनलाइन झूम मीटिंगद्वारे त्यांच्याशी चर्चा केली.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर सर्व आरोपींनी संगनमत करत फिर्यादीला मयन एंटरप्रायजेसच्या बंधन बँकेच्या खात्यावर ७५ लाख रुपये भरावयास लावले. आरोपींनी सांगितल्यानुसार फिर्यादीने ही रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केली. मात्र, बरेच दिवस होऊनही गुंतवलेल्या रकमेवर जादा नफा मिळाला नाही. यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे तपास करत आहे. शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन प्रकारे गुंतवणूक करताना समाज माध्यमांवर येणाऱ्या जाहिराती काळजीपूर्वक तपासण्याची आवश्यकता आहे. यात अनेक जाहिराती या फसवणुकीच्या असतात. नागरिकांनी याबाबत सजग राहावे, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्यामार्फत करण्यात आले.