

मिरज : स्वागत कमानचा स्लॅब कोसळले. त्यामध्ये सात कामगार जखमी झाले. या स्वागत कमानीसाठी दोन पिलर यापूर्वीच उभे केले आहेत. वरच्या बाजूचा स्लॅब ओतण्याचे काम काल सुरू झाले होते. त्यासाठी खालच्या बाजूने लाकडी पिलर उभे केले होते. मशीनच्या साहाय्याने काँक्रिट ओतताना कदाचित हे लाकडी पिलर सरकले असतील, त्यामुळे हा स्लॅब कोसळल्याचा अंदाज आहे.
मिरजेचे डीवायएसपी अजय कोकाटे, महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले व अन्य पोलिसांनी तत्काळ तेथे येऊन जेसीबीच्या साहाय्याने मदतकार्य सुरू केले. सर्व जखमी कामगारांना काँक्रिटच्या मालातून बाहेर काढून त्याच शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. येथे बचावकार्य सुरू असताना पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी भेट दिली व जखमींची विचारपूस केली. या घटनेबाबत सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. दरम्यान, या रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. रूपेश शिंदे म्हणाले, सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. दोघा कामगारांच्या हाडाला इजा झाली आहे. त्यावर देखील उपचार सुरू आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयास भेट देऊन दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली.