मिरज राजकीय वार्तापत्र : भाजपला…‘पुढे धोका आहे’, मंत्री सुरेश खाडे-मोहन वनखंडे वाद पुन्हा चव्हाट्यावर

मिरज राजकीय वार्तापत्र : भाजपला…‘पुढे धोका आहे’, मंत्री सुरेश खाडे-मोहन वनखंडे वाद पुन्हा चव्हाट्यावर
Published on
Updated on

मिरज; जालिंदर हुलवान : मिरज विधानसभा मतदार संघामध्ये सध्या प्राबल्य असणार्‍या भारतीय जनता पक्षाला अंतर्गत वादामुळे भविष्यात धोका निर्माण होणार असल्याचे चित्र दिसत आहे. पालकमंत्री सुरेश खाडे व भाजपचे मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख मोहन वनखंडे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मिरज हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मिरज पंचायत समिती असो किंवा तत्कालीन मिरज नगरपालिका असो या ठिकाणी काँग्रेसचे प्राबल्य असायचे. मिरज विधानसभा मतदारसंघात जनता दलाचे काही अपवाद वगळता काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. 2009 पासून मात्र भाजपचे सुरेश खाडे या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यानंतर मात्र मिरज मतदार संघामध्ये जिल्हा परिषद मतदार संघ, पंचायत समिती मतदारसंघ, ग्रामपंचायत महानगरपालिका यामध्ये बहुतांशी ठिकाणी भाजपची ताकद आहे.

2009 मध्ये मिरज विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदार संघ झाला. 2008 पासूनच सुरेश खाडे यांनी मिरजेत पाय रोवायला सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे सध्याचे अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे साथीला होते. वनखंडे हेच पालकमंत्री खाडे यांचे स्वीय सहायक होते. मात्र, यापूर्वी त्या दोघांमध्ये दोन वेळा काही कारणामुळे वितुष्ट निर्माण झाले. त्या दोन्ही वेळा पक्षातीलच काहींनी हा वाद मिटवला. आता पुन्हा त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. दोघांनीही जाहीरपणे या वादाबाबत कोणतीही कृती अथवा वक्तव्य केलेले नाही. गेल्या महिन्यांमध्ये सुरेश यांचे पुत्र सुशांत यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यावेळी भाजपचे महापालिकेचे नेते सुरेश खाडे यांनी वनखंडे यांचे नाव न घेता जाहीरपणे सुशांत खाडे यांच्याकडे राजकीय वारसा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर खाडे व वनखंडे यांच्यामध्ये पुन्हा वादाला सुरुवात झाली.

दहीहंडीच्या आडून राजकारण

भाजपकडून पहिल्यांदाच दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, खाडे आणि वनखंडे अशा दोन्ही गटांकडून दोन वेगवेगळ्या दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. त्यात वनखंडे यांना जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी साथ दिली आहे. मात्र, त्यांनी या नियोजनात महायुतीची चादर पांघरली.

मंत्री खाडे यांच्या गटाकडून आयोजित केलेल्या दहीहंडीसाठी आवटी गटाने सहभाग घेतला आहे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे. यापूर्वीच्या लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षही अन्य पक्षांपेक्षा सरस राहिला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश खाडे यांना ग्रामीण भागापेक्षा मिरज शहरांमध्ये कमी मते मिळाली होती. ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आगामी इच्छुक उमेदवारासाठी जमेची बाजू आहे. खाडे आणि वनखंडे यांच्यातील वाद वाढत गेला तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये याचा धोका उमेदवाराला व पर्यायाने भाजपला निर्माण होणार आहे. या पेचावर भाजप कशी मात करेल ते पाहावे लागेल, कारण अजून हाती वेळ आहे.

वनखंडेंच्या उमेदवारी बाबत चर्चा…

मोहन वनखंडे हे आता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीवर काम करत आहेत. त्यांच्याकडे मिरज विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख पद आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते मिरजेत विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांनी नकारघंटा वाजवली असली तरी त्यांची वाटचाल त्याच दिशेने सुरू असल्याची चर्चा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news