

सांगली ः मिरज पंचायत समिती कार्यालयास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी गुरुवारी अचानक भेट देऊन हजेरी रजिस्टरची तपासणी केली. त्यावेळी 70 टक्के कर्मचारी गैरहजर असल्याची माहिती समोर आली. सर्व संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच कार्यालयीन वेळेत नसणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सीईओ नरवाडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्याच दिवपांसून पावणेदहा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ही मोहीम सुमारे महिनाभर सुरूच होती. या मोहिमेत अनेकजण सापडले. लेट लतिफांवर प्रशासकीय कारवायादेखील झाल्या. पुढील टप्प्यात बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू केली. जिल्हा परिषदेत एकूण चार बायोमेट्रिक बसविले. कर्मचाऱ्यांनी सकाळी कार्यालयात हजर राहताना आणि सायंकाळी सुटी झाल्यानंतर त्यावर हजेरी नोंदविणे बंधनकारक केले. विशेष म्हणजे सर्व खातेप्रमुखांना देखील बायोमेट्रिक हजेरी नोंदविण्याचे आदेश दिले.
दरम्यान, मिरज पंचायत समितीमधील कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसतात, अनेकजण खुर्चीवर दिसत नाहीत. कार्यालयीन वेळेत इतर ‘उद्योग’ सुरू असल्याच्या तक्रारी सीईओ नरवाडे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी गुरुवारी अचानक दहाच्या सुमारास भेट दिली. त्यावेळी 60 ते 70 टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. गेट बंद करून त्यांनी रजिस्टरची तपासणी केली. लेट लतिफांना फैलावर घेतले.