

मिरज : येथील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 22 मध्ये एकच शिक्षक असल्याने आज संतप्त झालेल्या पालकांनी शाळेलाच टाळे ठोकले. महापालिका प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्याने आज संतप्त झालेल्या पालकांनी निषेध व्यक्त केला.
मिरजेतील इंदिरानगर येथे 22 क्रमांकाची शाळा आहे. अनेक वर्षांपासून येथे ही शाळा आहे. सध्या इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत 99 विद्यार्थी आहेत. येथे एकूण तीन शिक्षक होते. त्यापैकी दोन शिक्षक हे निवृत्त झाले. सध्या एकच शिक्षक या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. दोन दिवसांपूर्वी शाळा सुरू झाली आहे. त्यापूर्वीच पालकांनी महानगरपालिकेकडे लेखी तक्रार करून शिक्षक देण्याची मागणी केली होती. मात्र महानगरपालिकेने याकडे लक्ष दिले नाही. शिक्षकही दिले नाहीत. आज नेहमीप्रमाणे शाळा सुरू होण्याची वेळ आली होती. मुलांना सोडण्यासाठी पालक जमा झाले होते.
मात्र हा आपल्यावर अन्याय होत असल्याचे पाहून संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या गेटलाच कुलूप लावले. त्यानंतर उपस्थित असणारे एक शिक्षक तिथे आले. यावेळी विद्यार्थी हे गेटच्या बाहेरच बसले. यावेळी पालकांनी मात्र महापालिका प्रशासनाचा जोरदार निषेध व्यक्त केला. आम्ही मागणी करूनही शिक्षक उपलब्ध करून देत नसल्याने महानगरपालिकेने आमच्यावर व विद्यार्थ्यांवर अन्याय केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्वरित शिक्षक भरती न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या पालकांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत अधिकार्यांशी संपर्क साधला असता या घटनेची माहिती महानगरपालिकेच्या अधिकार्यांना नसल्याची स्पष्ट झाले.