

मिरज : पुढारी वृत्तसेवा
येथील प्रभाग तीनमध्ये भाजपच्या उमेदवार सुनीता व्हनमाने यांच्या घरावर हल्ला करून गाड्यांची तोडफोड करण्यात आली. अर्ज माघारी घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांनी हल्ला करून धमकावल्याची तक्रार व्हनमाने यांनी केली आहे. मिरजेतील प्रभाग ५ मध्ये अनुसूचित राखीव गटात भाजपच्या सुनिता व्हनमाने विरुद्ध शिंदे सेनेचे सागर व्हनखंडे अशी लढत होणार आहे.
चार दिवसापूर्वी येथे व्हनमाने व व्हनखंडे समर्थकांमध्ये बाचाबाची होऊन कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. याबाबत पोलिसात तक्रार न करता हे प्रकरण मिटविण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता अतुल वायदंडे, नीलेश गडदे, शुभम चंदनशिवे व त्यांच्या दहा ते पंधरा साथीदारांनी व्हनमाने यांच्या घरावर हल्ला चढवला. यावेळी घरासमोर असलेल्या मोटारीवर कोयता मारून काचा फोडण्यात आल्या.
दुचाकीची मोडतोड करण्यात आली. यावेळी व्हनमाने समर्थकही जमल्याने हल्लेखोर दुचाकीवरून अंधारात पसार झाले. यातील नीलेश गडदे व अतुल वायदंडे हे खून प्रकरणातील संशयित असून त्यांनी अर्ज माघारी घेण्यासाठी धमकावल्याची तक्रार सुनीता व्हनमाने यांचे पुत्र संदीप व्हनमाने यांनी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सागर व्हनखंडे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला असून याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतरही पोलिस तासभर उशिरा आल्याची तक्रार व्हनमाने यांनी केली आहे. हल्ल्याच्या घटनेचे चित्रण सीसीटीव्हीत झाले आहे.