कुपवाड : श्रीकांत मोरे
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी कुपवाड शहरातील प्रभाग एक, दोन आणि आठ या तीन प्रभागात शरद पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांच्यात उमेदवारीवर छुपा समझोता झाल्याचे दिसून आले, तर भाजपाने मित्रपक्षांना डावलून तीनही प्रभागात स्वबळावर लढण्याचे ठरविले आहे.
भाजपा, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी अनेकांना डावलल्याने नाराज निष्ठावंतांचा उद्रेक झाला आहे. कुपवाडच्या प्रभाग समिती तीनअंतर्गत एक, दोन आणि आठ या तीन प्रभागांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपा पॅनेलमध्ये रवींद्र सदामते, श्रीमती माया गडदे, पद्मश्री पाटील व चेतन सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली. या प्रभागात भाजपाचे जिल्हा चिटणीस विश्वजित पाटील यांना डावलण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करून बंडखोरीचा पवित्र घेतला आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आघाडी पॅनेलकडून माजी नगरसेवक शेडजी मोहिते, रईसा रंगरेज, विजय घाडगे, अभियंता सूर्यवंशी व प्रियंका विचारे यांची उमेदवारी फायनल केली आहे.
शिवसेना शिंदे गट पॅनेलमध्ये अनिल मोहिते, पायल गोसावी, रेश्मा तुपे, संदीप तुपे यांना तिकीट देण्यात आले. या प्रभागात भाजपाविरोधात काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आघाडी व शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात तिरंगी सामना होणार आहे. तसेच बंडखोरांची संख्या वाढल्याने मातब्बर उमेदवारांना बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपा पॅनेलमध्ये प्राजक्ता धोतरे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, धनपाल खोत यांच्या सून मालुश्री खोत व प्रकाश पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
काँग्रेस - राष्ट्रवादी शरद पवार आघाडी पॅनलकडून माजी नगरसेविका सविता मोहिते, अय्याज नायकवडी, प्रेरणा कोळी व समीर मालगावे यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटातून माजी नगरसेवक गजानन मगदूम यांना ऐनवेळी एबी फॉर्म देऊन उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, गजानन मगदूम यांना भाजपाने उमेदवारी डावलल्याने ते भाजपवर नाराज झाले. याचा फायदा राष्ट्रवादी अजित पवार गटाने घेतला आणि त्यांना अंतिमक्षणी उमेदवारी दिली.
या प्रभागात ओबीसी गटात प्रकाश ढंग आणि गजानन मगदूम यांच्यात मुख्य लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटातून अनिता वनखंडे, सिद्राम दळवाई, शमाबी मुजावर व विनायक यादव यांची उमेदवारी फायनल झाली आहे. याच प्रभागात जनसुराज्य पक्षातून डावललेले कासम मुल्ला यांनी शिवसेना ठाकरे गट निवडला आहे. या प्रभागात शुभांगी पवार, दाऊद मुजावर, महाराज मकानदार यांसह अनेक उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे बंडखोरीची डोकेदुखी मातब्बर उमेदवारांना होणार आहे.
भाजपा तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व असलेल्या प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजपा पॅनेलमध्ये माजी नगरसेवक दीपक वायदंडे, योगिता राठोड, मीनाक्षी पाटील व संजय पाटील (सांगाजे) यांची उमेदवारी फायनल झाली आहे. भाजपातून माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, माजी नगरसेविका कल्पना कोळेकर व सोनाली सागरे या तीन मातब्बर उमेदवारांचा पत्ता कट केल्याने त्यांनी भाजपवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याठिकाणी भाजपाने नव्या तीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
यामध्ये त्यांच्याजागी माजी नगरसेवक दीपक वायदंडे, योगिता राठोड, मीनाक्षी पाटील व संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी अजित पवार पॅनेलमध्ये सलग पाचव्यांदा मैदानात असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक विष्णू माने यांसह संजय कोलप, पूनम मोकाशी, प्रियांका देशमुख यांची उमेदवारी फायनल झाली. शिवसेना शिंदे गटात महेश सागरे, जिजाताई लेंगरे, नेत्रा कुरळपकर, स्वप्निल औंधकर व युवराज शिंदे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. या प्रभागात समाजवादी पार्टीतर्फे नितीन मिरजकर यांनी खुल्या गटात उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान उभे केले आहे.