

सांगली : मिरजेत गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या कर्कश आवाजामुळेच बाबासाहेब कलगुटगी या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे म्हणणे मांडत, डीजेविरोधी अभियानाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी पोलिस ठाण्यात धडक मारली. आवाजाच्या नियमाचे उल्लंघन करणार्या मंडळांवर कडक कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
मिरज शहरात बुधवारी काही गणेश मंडळांनी गणेश आगमन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसोबतच डीजेचा वापर केला. एका मंडळाच्या मिरवणुकीत डीजेच्या धडकी भरवणार्या आवाजामुळे मंडळाचे कार्यकर्ते कलगुटगी यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कलगुटगी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. प्रचंड कर्कश आवाजामुळे त्यांच्या हृदयावर ताण आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
मिरज शहरातील काही राजकीय नेत्यांनी, गणेशोत्सवादरम्यान डीजेवर मंडळांना निर्बंध घालू नका, त्यांच्यावर कारवाई करू नका, अशी वक्तव्ये काही दिवसांपूर्वी केली होती. त्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध करीत, हा प्रकार उत्सवात घडू नये, अशी मागणी पोलिसांकडे केली होती. तरीसुद्धा अनेक मंडळांकडून आवाजाच्या नियमाचे उल्लंघन बुधवारी झाले. त्यामुळे डीजेविरोधी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलिस निरीक्षक किरण रासकर यांची भेट घेऊन, कलगुटगी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली.
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी असतानाही पोलिस डीजेबाबत सौम्य भूमिका घेत असल्याचा आरोप विराज कोकणे यांनी केला. ओमकार शुक्ल, प्रशांत गोखले, मोहन वाटवे, भीमराव धुळबुळू, प्रकाश पवार यांनीही, असे प्रकार यापुढे घडू नयेत यासाठी पोलिसांनी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. डीजेच्या दणदणाटात एकाचा बळी गेल्याचे म्हणणे मांडत त्यांनी नाराजी व्यक्त केली.