Miraj News| मिरजेतील जागेच्या तडजोडीचा ठराव केला नाही : महापौर धीरज सूर्यवंशी

'त्या' जागेवर काँग्रेसने २००३ मध्येच दरोडा टाकलाय
Sangli municipal corporation |
Sangli municipal corporation |Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

सांगली : मिरज येथील जागा मूळ मालक सातवेकर यांना तडजोडीने देण्यासंदर्भात ठराव केलेला नाही. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी भाजपवर बिनबुडाचा आरोप केला आहे. उलट काँग्रेसनेच २००३ मध्ये महासभेचा ठराव करून या जागेवर दरोडा टाकलेला आहे. जागेच्या तडजोडीसंदर्भात २० ऑगस्ट २०२६ च्या महासभेत ठराव केल्याची कोणतीही कागदपत्रे मंगेश चव्हाण यांच्याकडे असतील, तर त्यांनी ती सादर करावीत, मी महापौर पदाचा व नगरसेवक पदाचा राजीनामा देतो. मात्र तसा ठराव झाल्याचा पुरावा दोन दिवसात सादर न केल्यास चव्हाण यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा व नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा, असे जाहीर आव्हान महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिले.

महापौर सूर्यवंशी म्हणाले, २० ऑगस्ट २०२६ च्या महासभेत ऐनवेळचा विषय घुसडून मिरजेतील जागेच्या तडजोडीचा ठराव केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे. हा भूखंड घोटाळा आहे, भाजपने ३५ कोटींचा दरोडा टाकला आहे, असाही आरोप चव्हाण यांनी केलेला आहे. मी दोन दिवस बाहेरगावी असल्याने चव्हाण यांच्या आरोपाला उत्तर देता आले नाही. मात्र चव्हाण यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. मिरजेतील जागेवर दरोडा टाकलाय, हा आरोप बरोबर आहे, पण हा दरोडा भाजपने नव्हे, तर काँग्रेसने २००३ मध्येच टाकला आहे.

मिरजेतील स.क्रं. ९/२,३,४,५ मधील एकूण २७,४९८ चौ.मी. क्षेत्रापैकी २५,४९८ क्षेत्र हे अर्बन लँड सिलिंग कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरले होते. ही जमीन महापालिकेकडे वर्ग केली होती. त्याविरोधात जमीन मालकाने नगरविकास विभागाकडे अपील केले होते. त्यावर नगरविकास विभागाने १४ मे २००३ रोजी आदेश काढला. त्यावर २२ मे २००३ च्या महासभेत ठराव झाला. संबंधित जागेतील १२ मीटर रुंदीच्या दोन व ३० मीटर रुंदीच्या एका प्रस्तावित रस्त्याखालील क्षेत्र विनामोबदला महापालिकेकडे हस्तांतर करण्यास तयार असतील, तर या रस्त्यांचे क्षेत्र वगळून उर्वरित जागा जमीनधारकाच्या ताब्यात देण्यास त्यावेळी मंजुरी दिलेली आहे. या ठरावावर तत्कालीन महापौरांची आहे. म्हणजे त्या जागेवर काँग्रेसने २००३ मध्येच दरोडा टाकलेला आहे, अशी टीका महापौर सूर्यवंशी यांनी केली.

२० ऑगस्ट २०२६ च्या महासभेतील ठराव क्रमांक १३५ ही मिरजेतील जागा सातवेकर यांना तडजोडीने देण्यासंदर्भातील नाही, तर तो अंगणवाडी सेविकांसंदर्भातील आहे. महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये सुरू असलेल्या बालवाड्यांमधील सेविका यांना शासनाच्या अंगणवाड्यांमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठवण्यास मान्यता दिल्याचा ठराव आहे. विरोधी पक्षनेते चव्हाण यांचे आरोप बिनबुडाचे आहेत.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेला १०० कोटींचा निधी, घनकचरा व ड्रेनेज योजनेसह अन्य योजना, कामांवर एक हजार ते दीड हजार कोटी रुपयांची कामे झाली आहेत. त्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार झाला नाही. विरोधी पक्षनेते मात्र लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांनी महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उभे राहून महापालिका क्षेत्रातील नागरिकांची माफी मागावी.

'त्या' जागेचा विषय पुढील महासभेत

महापौर सूर्यवंशी म्हणाले, मिरजेतील त्या जागेसंदर्भातील विषयपत्र प्रशासनाने दिलेले आहे. पुढील महासभेच्या विषयपत्रिकेवर विषय ठेवला जाईल. मिरजेतील त्या जागेत प्रधानमंत्री ई-बस डेपो व चार्जिंग स्टेशन होणे आवश्यक आहे. नागरिकांसाठी ई-बस सेवा सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील महासभेत त्या जागेसंदर्भात चर्चा होईल. जागेसंदर्भात तडजोड करायची की नाही करायची, तडजोड करावी लागत असेल तर ती कशाप्रकारे करायची, प्रशासनाचे मत काय आहे, यापूर्वीचे ठराव, नगरविकासचे आदेश, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निकाल तसेच सध्या सुरू असलेले दावे या सर्व बाबींवर चर्चा करून योग्य तो निर्णय होईल. भाजप पक्षाला व नेत्यांना डाग लागेल, असे कोणतेही कृत्य आम्ही करणार नाही. 

स्थायी सभापती अनुपस्थित...

महापौर सूर्यवंशी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला सभागृह नेते संदीप आवटी, समाजकल्याण सभापती गीता पवार, महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार, भाजपचे नगरसेवक निरंजन आवटी, प्रकाश पाटील, संजय यमगर, उदय बेलवलकर, दरिबा बंडगर, दयानंद खोत, मोहन वाटवे, केदार खाडिलकर, रवींद्र सदामते, रोहिणी पाटील, माया गडदे, मीनाक्षी पाटील, योगिता राठोड, कीर्ती देशमुख, लक्ष्मी सरगर उपस्थित होते. स्थायी समिती सभापती अतुल माने व काही नगरसेवकांच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधले असता महापौर सूर्यवंशी म्हणाले, सभापती माने यांच्याशी संपर्क झाला. ते काही कारणांमुळे बाहेर असल्यामुळे उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान हे आमच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांची भूमिका मांडतील, असेही महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.

आमच्यात एक नारदमुनी : महापौर

आमच्या पक्षात एक नारदमुनी आहे. झारीतील शुक्राचार्य बनून काम करत आहे. त्यांचा आम्ही बंदोबस्त करणार आहे. आगामी काळात ते वैफल्यग्रस्त झाल्याचे पाहायला मिळेल, असेही महापौर सूर्यवंशी म्हणाले.

काँग्रेस म्हणजे खुळ्यांचा दवाखाना

काँग्रेस म्हणजे खुळ्यांचा दवाखाना आहे. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण खुळ्यागत करत आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी हवेत गोळीबार करत आहेत. ते ई-बस सेवेत खोडा घालण्याचे काम करत आहेत. जनता त्यांना कदापिही माफ करणार नाही, अशी टीका महापौर सूर्यवंशी यांनी यावेळी केली. मंगेश चव्हाण यांनी नगरसचिवांना दमदाटी केली आहे. आम्ही ते सहन करणार नाही, असा इशारा महापौर सूर्यवंशी व सभागृह नेते संदीप आवटी यांनी दिला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news