

मिरज : मिरजेत म्हमद्या नदाफ आणि काझी टोळीमध्ये अनेक दिवसांपासून टोळीयुद्ध सुरू आहे. यातून मिरज शहरात दहशत निर्माण करून एका हॉटेलची देखील तोडफोड करण्यात आली. या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आली असून, मिरज शहर डीबीच्या पथकाची खरडपट्टी काढत ती बरखास्त करण्यात आली.
म्हमद्या नदाफ याचा साथीदार समीर कुपवाडे याच्या हॉटेलची काझी टोळीने तोडफोड करून मोठे नुकसान केले होते. याप्रकरणी समीर कुपवाडे याने काझी गटातील 50 जणांविरुद्ध मारहाण, तोडफोड आणि दरोड्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी मतीन काझी, मोहिद्दिन काझी आणि बिलाल काझी या तिघांना अटक केली. या मारहाणीमध्ये समीर कुपवाडे याच्यासह सहाजण जखमी झाले होते.
याप्रकरणी बिलाल काझी यानेदेखील तक्रार दिली आहे. मागील भांडणाचा राग मनात धरून मारहाण केल्याचे तसेच मतीन काझी याच्यावर हत्याराने हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये समीर कुपवाड याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरजेत म्हमद्या नदाफ आणि काझी टोळीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. हा प्रकार थोपविण्यात मिरज शहर पोलिस ठाण्यातील डीबी पथकाला अपयश आल्याचे दिसून येत होते. मिरजेतील घटनेची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली.