

भिवंडी : ठाणे पोलीस आयुक्तांनी ९ सप्टेंबर रोजी जारी केलेले मनाई आदेश झुगारण्यासह अवैधपणे अग्निशस्त्रांची मालेगावहून विक्रीच्या उद्देशाने भिवंडीत वाहतूक करणाऱ्या टोळीचा नारपोली पोलिसांनी पर्दाफाश केला.
मंगळवारी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. कारचालक जमील अन्सारी (३४ रा. दिघा, नवी मुंबई), टोळीतील म्होरक्या कासिम अहमद अन्सारी उर्फ राजवीर उर्फ पापाजी (२८ रा. मालेगांव, धुळे), कैलास घोडविंदे (४५ रा. चाणे, भिवंडी), शिवा शेट्टी (४६ रा. मालाड, मुंबई), मोहम्मद नफीज कमरूद्दीन कुरेशी (३६ रा. कौसा, मुंब्रा) अशी अटक केलेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत.
१७ सप्टेंबर रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास पडघा टोलनाक्या जवळ सव्वा दोनच्या सुमारास ओवळी ते मानकोली ब्रिजच्या अलीकडच्या सर्व्हिस रोडने ५ आरोपी आपसात संगनमत करून कारने येवून अवैधपणे अग्निशस्त्रांची वाहतूक करणार असल्याची खबर नारपोली पोलिसांना मिळाली होती.
त्यानुषंगाने पोलिसांनी ओवळी नाक्यावर सापळा रचत संशयितांची कार थांबवून झडती घेतली असता तस्करीतील मास्टर माईंड कासिम अन्सारी उर्फ पापाजीने पकडले जाण्याच्या भीतीने सुऱ्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुस्थितीत आहे. दरम्यान आरोपींवर गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली असता त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्याकडून अग्निशस्त्राच्या साठ्यासह १५ लाख २९ हजार रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.