मिरज सिव्हिल चालणार सौरऊर्जेवर

मिरज सिव्हिल चालणार सौरऊर्जेवर

मिरज; जालिंदर हुलवान :  मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह हे सौर ऊर्जेवर चालणार आहे. यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. नवीन वसतिगृह, लेक्चर व प्रॅक्टिकल हॉल यासाठीही 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातूनही अनेक गरजूंना येथे आरोग्य सेवा दिली जाते. अनेक उपचार येथे मोफत व अत्यल्प दरामध्ये असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होतो. गेल्या तीन वर्षांपासून रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात निधी मिळू लागला आहे. हे रुग्णालय सौरऊर्जेवर चालू करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून तीन कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. संपूर्ण रुग्णालय व विद्यार्थ्यांचे वसतिगृह या सौरऊर्जेवर चालणार आहे.

एमबीबीएसचे 1200 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे 300 असे सुमारे पंधराशे विद्यार्थी येथे वैद्यकीय प्रशिक्षण घेत आहेत. या दीड हजार विद्यार्थ्यांसाठी केवळ निम्म्याच विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय आहे. त्यातही अनेक विद्यार्थी एका खोलीमध्ये चार ते पाच जण राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. येथे वसतिगृह नव्याने बांधण्याची गरज होती. तसा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने केंद्र शासनाकडे दिला होता. त्यानुसार केंद्र शासनाने 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून 2 वसतिगृह, 2 प्रॅक्टिकल हॉल, 2 लेक्चर हॉल बांधण्यात येणार आहेत. वसतिगृहामुळे सुमारे 400 विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. सध्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ग्रंथालय अद्ययावत करण्यासाठी नवीन बांधकाम सुरू झाले आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यापासून भुयारी गटार व सांडपाण्याची निचरा करण्याची सोय नव्हती. प्रशासनाने राज्य शासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठवला होता. शासनाने भुयारी गटार व सांडपाणी निचरा करण्यासाठी सुमारे 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रुग्णालय प्रशासन या निधीच्या प्रतीक्षेत आहे. या रुग्णालयात अग्निशमन विभागही सुधारण्याची गरज होती. त्यासाठीही शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. पूर्वी असणार्‍या अग्निशमन विभागांमध्ये आधुनिकता आणली जाणार आहे.

रुग्णालयामध्ये सिटीस्कॅनची मशिन उत्तम आहे. मात्र, एमआरआय ही मशिन खूप जुनी झाली आहे. एमआरआय करण्यासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या ही खूप मोठी आहे. मात्र, ही मशिन खराब होत आली असल्याने रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. सुमारे दहा ते पंधरा दिवसांची यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सुमारे वीस कोटी रुपये जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पालकमंत्री सुरेश खाडे यांनी हे एमआरआय मशिन घेण्यासाठी निधी दिला आहे. त्याचे टेंडर लवकरच होणार आहे. परदेशी बनावटीचे हे मशीन असल्याने त्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे. मात्र, चांगल्या दर्जाची मशिन घेण्यासाठी प्रशासनाकडून परदेशी कंपन्यांकडे माहिती घेतली जात आहे.

राज्यातील पहिली स्किल लॅब होणार…

महाराष्ट्रात कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामध्ये स्किल लॅब नाही. त्यामुळे एमबीबीएस व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाचूनच प्रशिक्षण घेतले जाते. मात्र, स्किल लॅब झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्षात उपचाराबाबत प्रॅक्टिस करून प्रशिक्षण देता येणार आहे. त्यामुळे स्किल लॅबची वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका राहील. असे स्किल लॅब महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नाही. जिल्हा नियोजन मंडळातून मिरज वैद्यकीय महाविद्यालय येथे या स्किल लॅब यासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले. त्याचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे.

सुपर स्पेशालिटीचा प्रस्ताव प्रतीक्षेत…

मिरजेच्या या शासकीय रुग्णालयामध्ये गतवर्षी केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांनी भेट दिली होती. यावेळी या रुग्णालयामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यानुसार प्रशासनाने केंद्र शासनाकडे या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी चार महिन्यांपूर्वी प्रस्ताव दिला. या हॉस्पिटलसाठी सुमारे दोनशे कोटी रुपयांची गरज लागणार आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. हे हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर त्यामध्ये न्यूरोसर्जन, युरोलॉजी, कार्डिओलॉजी, कॅन्सर, पोटाचे विकार, ट्रॉमा सेंटर यासह विविध विभाग उभारण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news