

सांगली : शरद पवार यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसचा झेंडा ठिकठिकाणी रोवला. तेच शरद पवार एका दिवसात कसे वाईट झाले? त्यांनी काय दरोडा घातला आहे का? त्यांनी खऱ्याला खरे म्हटले. मात्र, काँग्रेसला त्याचा त्रास होत आहे, अशी टीका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना केली.
संजय राऊत यांचे राजकारणही शरद पवार यांच्याशिवाय चालत नव्हते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात जे घडले, ते शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या माध्यमातून केले, असे बोलले जात होते. आता तेच शरद पवार यांच्याबद्दल बोलणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पालकमंत्री म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघ पुनर्रचनेबाबत ठणकावून सांगितले. तसेच, 'मी कोणाची मुलगी आहे, असल्या पत्रकारांना भीक घालत नाही,' असे त्या कोणाला म्हणाल्या? मतदारसंघ पुनर्रचना हा विषय आम्हालाही त्रासदायक ठरू शकतो. दर वीस वर्षांनी मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा क्रम आहे. यात कोणाला फायदा होईल, तर कोणाला तोटा.
ते म्हणाले, २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांनंतरही विरोधकांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे देश अस्थिर करण्याचा आणि लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. विरोधकांकडून आता 'दिमागी नक्षलवाद' सुरू झाला आहे.
मतदार यादीतून सुमारे १३ कोटी नावे वगळली. यामध्ये सुमारे दीड कोटी मृत मतदार, तर सहा ते साडेसहा कोटी स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे. कोथरूड मतदारसंघात काही मतदारांची नावे गावात आणि शहरात अशा दोन्ही ठिकाणी आहेत. पूर्वी अशा मतदारांना गावाकडे मतदानासाठी नेण्यासाठी गाड्या आणि अन्य सुविधा दिल्या जात होत्या. सांगली जिल्ह्यातील चंदूशेठ कदम आता बघूया कसे निवडून येतात ते. पलूस-कडेगावमधील दहा ते बारा हजार मतदारांची नावे पुण्यात नोंदविली आहेत. आता एकाच ठिकाणी नाव ठेवावे लागणार आहे. त्यामुळे मतदारांची नावे पुण्यात ठेवायची की पलूसमध्ये, यावरून आमदार डॉ. विश्वजित कदम आणि चंदूशेठ कदम यांचा वाद सुरू असल्याचे पालकमंत्री म्हणाले.