सांगली : महापालिका क्षेत्रात महापूर तसेच साचून राहणार्या पावसाच्या तसेच महापुराच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिकेने बुधवारी जागतिक बँकेच्या पथकापुढे 476 कोटी रुपयांच्या आराखड्याचे सादरीकरण केले. शामरावनगरसह 78 ठिकाणी करावयाच्या विविध उपाययोजनांचा आराखड्यात समावेश आहे. या आराखड्यात पर्यावरणीय व सामाजिक बाबींच्या उपाययोजनांचाही समावेश करण्याच्या सूचना जागतिक बँकेच्या पथकाने केली.
जागतिक बँकेचे आपत्ती जोखीम व्यवस्थापन विशेषज्ञ अनुप कारंथ, वरिष्ठ वित्तीय व्यवस्थापन विशेषज्ञ सविनय ग्रोव्हर, वरिष्ठ सामाजिक विकास विशेषज्ञ वरुण सिंग, वरिष्ठ पर्यावरण विशेषज्ञ नेहा व्यास यांच्यासमवेत महापालिकेत बैठक झाली. महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, चंद्रकांत खोसे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे, आरोग्याधिकारी (स्वच्छता) डॉ. रवींद्र ताटे, सहायक आयुक्त (आपत्ती व्यवस्थापन) नकुल जकाते, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, अभियंता महेश मदने उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रातील पूरबाधित क्षेत्र, हरिपूरच्या पूर्वेकडील काळीवाट ते विश्रामबाग ते वॉनलेसवाडी, कुंभारमळापर्यंतच्या परिसरात कायम साचून राहणारे पाणी, याशिवाय महापालिका क्षेत्रातील विविध 78 ठिकाणी रस्ते, सखल भागात साचून राहणारे पावसाचे पाणी याचा निचरा होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. महापालिका क्षेत्रातील 11 नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, पक्के बांधकाम तसेच सर्व छोट्या नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, त्यावरील अतिक्रमण काढणे, छोटे पूल बांधणे, भोबे टाईप मोठ्या गटारी बांधणे, या गटारीत न येणार्या पाण्याचा उपसा करण्यासाठी शामरावनगरमध्ये दोन ठिकाणी पंपिंग स्टेशन व अन्य कामांचा समावेश आहे. या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या सज्जतेबद्दल समाधान व्यक्त केले.
पूरक्षेत्रातील कॅमेरे अत्याधुनिक असावेत. महापुराची पाणी पातळी वाढेल, तसतसे पूरबाधित क्षेत्रात किती फूट पाणी येईल, याची आगाऊ माहिती देण्याची यंत्रणा अधिक सक्षम करा, अशी सूचनाही जागतिक बँक पथकातील अधिकार्यांनी केली.