सांगली: विटा येथील यंत्रमाग आठवड्यातील तीन दिवस बंद राहणार

सांगली: विटा येथील यंत्रमाग आठवड्यातील तीन दिवस बंद राहणार

विटा: पुढारी वृत्तसेवा: वस्त्रोद्योग व्यवसायातील अभूतपूर्व मंदीच्या पार्श्वभूमीवर विट्यातील यंत्रमाग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आज (दि.१६) विटा यंत्रमाग असोसिएशनच्या कार्यालयात बैठक झाली.

यंत्रमाग व्यवसायात अनेक जाचक अटी आणि नियम

मागील सहा महिन्यांपासून राज्यातील यंत्रमाग व्यवसायात अनेक जाचक अटी आणि नियम केंद्र आणि राज्य सरकारकडून लादले जात आहेत. त्याचा फटका यंत्रमाग व्यवसायाला बसत आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज येथील मायणी रस्त्या लगतच्या विटा यंत्रमाग संघाच्या कार्यालयात शहर आणि परिसरातील यंत्रमाग धारकांची व्यापक बैठक झाली.

४५ दिवसांवरील देणे बाकी बिलावर आयकर आकारणार

यामध्ये केंद्र शासनाने आयकर कायदा ४३ बी (एच) मध्ये सुधारणा करुन लघुउद्योगा तील उत्पादीत प्रथम विक्री बिलाचे पेमेंट ४५ दिवसांतच केले पाहिजे. अन्यथा ४५ दिवसांवरील देणे बाकी बिलावर आयकर आकारण्यात येईल, असा कायदा केल्यापासून राज्यातील सर्व वस्त्रोद्योग साखळी प्रभावित झालेली आहे. तसेच फेब्रुवारी २०२४ पासून या कायद्याच्या बडग्याने वस्त्र साखळीतील उत्पादीत सूत, कापड या उत्पादनांना पुरेसे गिऱ्हाईक नसल्याने साठा पडून राहत आहे. परिणामी विक्री किंमतींवर परिणाम झाला आहे.

नुकसान टाळण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस कारखाने बंद

शिवाय जागतिक बाजार पेठेतील कापूस दरापेक्षा आपल्याकडील कापूस प्रती खंडीस सुमारे पाच हजारांनी महाग असल्याने कापूस, सूत आणि कापड निर्यात मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. कापूस प्रती खंडी पाच हजार जास्त असल्याने आपल्या सूताची उत्पादन किंमत प्रति किलोला सुमारे १५ ते २० रुपये तर कापड क्वालिटी निहाय ५० पैसे ते २ रु. प्रतीमिटर महाग बसत आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून संपूर्ण वस्त्र साखळीतील सूत आणि कापड ही दोन्ही उत्पादने मागील पाच महिन्यापासून नुकसानीत विकावी लागत आहेत. शिवाय निर्यात कमी होण्याचा परिणाम म्हणून उत्पादीत मालाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त असल्याने माल विकणे पण खूपच त्रासाचे झाले आहे. या सर्व परिस्थितीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती नुकसान टाळण्यासाठी कापड उत्पादन कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्यातील तीन दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने यावेळी घेण्यात आला.

या बैठकीत विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर, सुरेश म्हेत्रे, वैभव म्हेत्रे, शशिकांत तारळेकर, शिवाजीराव कलढोणे, विनोद तावरे, राजेंद्र चौगुले, विवेक अनिल चोथे, नितीन तारळेकर, मिलिंद चोथे, प्रकाश उंदरे, श्रीराम लिपारे, विपुल तावरे, सचिन रसाळ, रेवण शेंडे, शितल वासुदेव चोथे, राजेंद्र म्हेत्रे, डी. के. चोथे, दत्तात्रय कलढोणे, सतीश लाटणे आदीसह अनेक यंत्रमाग धारक सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news