सांगली : पुढारी वृत्तसेवा
मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कसले मागता? देशाचा संसार चालविणार्यांनी आरक्षण मागावं का? मराठा जात ही सबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या जेव्हा लक्षात येईल, तेव्हा मातृभूमीचे भाग्य उजळून येईल; पण हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे, असे स्पष्ट मत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.
बांगला देशात हिंदूंवर होणार्या अत्याचाराचा निषेध म्हणून 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा कडकडीत बंद पुकारला जाणार असल्याची माहिती देण्यासाठी भिडे यांनी पत्रकार बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मराठा आरक्षणाबाबतही आपली रोखठोक मते व्यक्त केली. ते म्हणाले, जंगलातले वाघ आणि सिंह कमांडो टे्रनिंग कॅम्पला जातील का? त्यांनी तिथं प्रवेश घ्यावा का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडानं प्रवेश घ्यावा का? मासा कधी स्वीमिंग क्लबमध्ये प्रवेश घेईल का? अशाच पद्धतीनं, उभा देश चालविणार्या मराठ्यांनी आरक्षण मागावं का? सिंहांनी सारे जंगल सांभाळायचे असते. देशाचा संसार चालविणार्या मराठ्यांना हे लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, पाकिस्तानचा भाग म्हणून बांगला देशाची निर्मिती झाली. तिथं बेबनाव झाल्यामुळे तिथल्या पंतप्रधान हिंदुस्थानात आश्रयाला आल्या. दुसरीकडे कुठेही न जाता त्या भारतातच आल्या. इतरांना आश्रय देण्याची आपली परंपरा आहे. पण याचा गैरफायदा इतरांनी घेऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरुध्द सार्या राजकारण्यांनी स्वार्थ बाजूला ठेवून पोटतिडकीने बोलले पाहिजे, पण ते एकमताने उभे राहत नाहीत, हे दुर्दैव आहे. सारे एकाच तळ्यातले मासे आहेत. दुर्दैवाने देशाच्या प्रश्नावर आपले दुमत असते. शत्रू कोण मित्र कोण काहीच कळत नाही. देश हा देव असे माझा याऐवजी स्वार्थ हा देव असे माझा, ही भावना दुर्दैवी आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी अविनाश देसाई, हणमंत पवार, संजय तांदळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणतीही भारतीय स्त्री ही भारतमातेसमान आहे. भारतमातेचे स्वातंत्र्य साजरे करताना स्त्रीबाबतची ही मातृत्वाची श्रध्दा असलेली माणसे नाहीत. श्रध्दा नसल्यानं रोज बलात्काराच्या घटना घडत आहेत. नुसती ‘माझी लाडकी बहीण’ योजना करून स्त्रीला मानधन देऊन उपयोग नाही, तर तिच्या शिलाबद्दलही अभिवचन दिले पाहिजे. बलात्कार करणार्यांना जबर शिक्षा व्हायला पाहिजे. शिवछत्रपतींच्या विचारानं राष्ट्र चाललं पाहिजे, असे भिडे गुरुजी यांनी सांगितले.
बांगलादेशाच्या पंतप्रधान हिंदुस्थानात आल्या, पण तिथे मात्र हिंदूंवर अत्याचाराचे संतापजनक प्रकार सुरू आहेत. हे थांबले पाहिजे, यासाठी कोणीही, कसलीही भूमिका घेतली नाही. मोदी म्हणजे कडवा देशभक्त. त्यांनी याविरुध्द घवघवीत पावले उचलावीत. कायमची लक्षात राहतील अशी पावले केेंद्र सरकारने उचलावीत, अशी समाजाची अपेक्षा आहे. हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध म्हणून 25 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक गावात बंद पाळण्यात येणार आहे. 20 रोजी याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशीही माहिती भिडे यांनी दिली.