नाशिक : मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे यांची राज्यभरात शांतता रॅली सुरू आहे. मंगळवारी (दि. १३) ही रॅली शहरात येत असल्याने मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस या ठक्कर बसस्थानकातून सुटणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक किरण भोसले यांनी दिली आहे.
मनोज जरांगे यांनी राज्यात ठिकठिकाणी काढलेल्या शांतता रॅलीचा समारोप नाशिक येथे आज मंगळवारी (दि. १३) रोजी होणार आहे. त्यांनी राज्यात ठिकठिकाणी काढलेल्या शांतता फेरीचा समारोप नाशिक येथे मंगळवारी आज होत आहे. या फेरीला तपोवनातून सुरुवात होणार असून पंचवटीतील स्वामीनारायण मंदिर चौक-काट्या मारूती चौक- दिंडोरी नाका-पंचवटी कारंजा-मालेगाव स्टँड-रविवार कारंजा-सांगली बँक चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ समारोप होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात येणार आहे. रॅलीमुळे मार्गावर कोंडी होऊ नये, यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. पुणे, नगर येथील शांतता रॅलीला भव्य प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या रॅलीचा समारोप मंगळवार (दि. १३) नाशिकमध्ये होत आहे. तपोवन ते शिवस्मारक, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जरांगे-पाटलांच्या रॅलीचा समारोप होऊन सीबीएस चौकात सभा होणार आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकामधून रोज होणारी वाहतूक वळविण्यात आली असून, एक दिवसासाठी येथून सुटणाऱ्या सर्व बसेस या ठक्कर बाजार बसस्थानकातून सुटणार आहे.
स्वामी नारायण चौकापासून ते कन्नमवार पूल, मिर्ची सिग्नल ते स्वामी नारायण चौक, संतोष टी पॉइंट ते दिंडोरी नाका, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा ते सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल ते सीबीएसच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.
मराठा आरक्षण शांतता फेरीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजबांधव येणार आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी पंचवटीतील निलगिरी बाग, दिंडोरीकडून येणाऱ्या वाहनांसाठी शरदचंद्र पवार बाजार समिती, घोटी, इगतपुरी, मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी महामार्ग बस स्थानकाशेजारील मोकळ्या जागेत, डोंगरे मैदान आदी ठिकाणी वाहनतळ करण्यात आलेले आहे.