दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना जिल्हा बँकेतर्फे मदत : मानसिंगराव नाईक

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना जिल्हा बँकेतर्फे मदत : मानसिंगराव नाईक

सांगली; पुढारी वृत्तसेवा : यंदा पावसाने ओढ दिल्याने जवळपास संपूर्ण जिल्ह्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या संकटात जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम उभी राहणार आहे. शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी तातडीने आराखडा तयार करण्याचे आदेश बँक प्रशासनास दिले आहेत. संचालक मंडळाच्या येणार्‍या बैठकीत या आराखड्यास मान्यता देण्यात येणार आहे. ही माहिती बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी दिली.

बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळ, शेती कर्जाची वसुली व शेतकर्‍यांच्या मदतीवर चर्चा करण्यात आली. आ. नाईक म्हणाले, तीन मंडल (सर्कल) वगळता सर्व जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. संबंधीत तीन मंडलांमध्येही लवकरच दुष्काळ जाहीर होणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी शासनाकडे पाठवला आहे.

ते म्हणाले, बँकेतर्फे पीक व तालुकानिहाय नुकसानीचे आकडे संकलित करण्याचे आदेश बँक प्रशासनास दिले आहेत. ऊस, द्राक्ष, डाळिंब, हळद, भात यांसह सर्वच पिकांच्या नुकसानीची सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने जिल्हा बँक संकलित करत आहे. या माहितीसह कोणत्या पिकाला किती कर्जपुरवठा केला, या सर्वांची तालुकानिहाय माहिती जमा करून शेतकर्‍यांना कोणती मदत करायची, याचा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत यावर चर्चा करून शेतकर्‍यांना मदतीचा निर्णय घेतला जाणार आहे. शासनाच्या आदेशानुसार दुष्काळाचे सर्व निकष पाळून जिल्हा बँकेच्यावतीने शेतकर्‍यांना काही अतिरिक्त मदत करता येते का, याबाबतही बँक सकारात्मक निर्णय घेईल. शेतकर्‍यांचे कर्जाचे पुनर्गठन, व्याज आकारणी व अन्य मदतीचा यात समावेश असणार आहे.

'महांकाली'च्या करार रद्दला स्थगिती

आ. नाईक म्हणाले, महांकाली साखर कारखान्याने करारानुसार मुदतीत जमीन विक्री करून जिल्हा बँकेचे कर्ज परतफेड केले नाही. त्यामुळे बँकेने कारखान्यास नोटीस बजावून सदरचा करार रद्द केल्याचे तसेच कारखान्यास नियमित थकबाकीवर व्याजदर आकारण्याचे कळवले होते. या नोटिसीविरोधात कारखान्याने ऋण वसुली प्राधिकरणाकडे (डीआरटी) धाव घेतली. प्राधिकरणाने बँकेच्या नोटीसीस दीड महिना स्थगिती दिली असून या काळात कराराप्रमाणे पैसे भरण्यास कारखान्यास सांगितले आहे.

बँकेने सुमारे 1 हजार 800 रुपयांचे पीककर्ज दिले आहे. इतरही कर्जे आहेत. शेतकर्‍यांना मदतीसाठी आमचा प्रयत्न असणार आहे.
– मानसिंगराव नाईक,
आमदार, अध्यक्ष, जिल्हा बँक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news