Manoj Jarange Patil: आता अंतरवालीऐवजी मुंबईत उपोषण? मनोज जरांगे-पाटील यांचे संकेत

लोकभावनेचा विचार करून निर्णय घेणार
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
Published on
Updated on

कडेगाव शहर : आधी अंतरवाली सराटी येथे उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यात लोकभावना लक्षात घेता आता मुंबईतच उपोषण करण्याबाबत विचार सुरू आहे. हे आंदोलन २९ ऑगस्टलाच करायचे का, याबाबत सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असा मोठा संकेत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी कडेगाव येथील पत्रकार परिषदेत दिला.

‘मागील वेळी महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबईत आला होता. मात्र, यावेळी सुरत, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणासह देशातील विविध राज्यांतील मराठा बांधव मुंबईत दाखल होतील, असा इशाराही त्यांनी दिला. २९ ऑगस्ट रोजी आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने २८ ऑगस्टपर्यंत प्रलंबित मागण्यांवर निर्णय घ्यावा. राज्यातील ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे पात्र मराठ्यांना प्रमाणपत्रे व जात पडताळणी देताना निर्माण होणारे अडथळे दूर करावेत, सातारा, कोल्हापूर व औंध गॅझेटची अंमलबजावणी करावी आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

कुणबी नोंदींच्या आधारे दाखला घेतलेला असतानाही जात पडताळणीवेळी तो रद्द करण्याच्या प्रकारावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘झालेली चूक दुरुस्त करा’, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी विचारले, ‘सरकार जातपडताळणी समितीत हस्तक्षेप करत नाही असे सांगते; मग मंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून तातडीने प्रस्ताव का मागवला? हा हस्तक्षेप नाही का?’

जुन्या नोंदींमधील अक्षर, शाई किंवा हस्ताक्षरातील फरक दाखवून त्या रद्द करू नयेत, असे सांगताना ‘तलाठी बदलतात, त्यामुळे अक्षरही बदलते. एकच तलाठी पन्नास वर्षे गावात राहतो का?’ असा सवाल त्यांनी केला. ‘अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने चूक दुरुस्त करावी; अन्यथा २९ ऑगस्टपासून अधिक ताकदीचा लढा उभारू. न्याय मिळेपर्यंत माघार नाही’, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news