Sangli Manganga river water scarcity|पावसाळा संपला, तरी माणगंगेची तहान भागेना! नदीपात्र कोरडे ठाक

लिंगीवरे, गिड्डे वस्ती, यादव वस्तीचे बंधारे कोरडेच
दिघंची: माणगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे
दिघंची: माणगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे
Published on: 
Updated on: 

दिघंची : शिवानंद क्षीरसागर

माणदेशाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी माणगंगा नदी पावसाळा संपला, तरी तहानलेलीच आहे. जून ते सप्टेंबर हे चारही पावसाळी महिने उलटून गेले, तरी नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. लिंगीवरे, गिड्डे वस्ती आणि यादव वस्ती येथील कोल्हापूर पध्दतीचे बंधारेही कोरडेठाक पडले आहेत.

नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, आगामी काळात पाणीटंचाई आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही बिकट होण्याची भीती आहे. कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या माणदेशात माणगंगा नदीला पाणी कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

टेंभूच्या पाण्याची प्रतीक्षा कायम !

सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील दुष्काळी पट्ट्यातून वाहणारी माणगंगा नदी या भागातील शेतीसाठी महत्त्वाचा आधार आहे. नदीकाठच्या अनेक गावांतील शेतकरी शेतीच्या पाण्यासाठी नदीपात्र, बंधारे आणि परिसरातील विहिरींवर अवलंबून आहेत. पावसाळ्यात नदीपात्रात पाणी आल्यास बंधाऱ्यांमध्ये साठा होतो. त्यातून शेतीला पाणी मिळण्याबरोबरच परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होते. टेंभू योजनेद्वारे माणगंगा नदीपात्रात पाणी सोडले जाते. या पाण्यामुळे नदीवरील बंधारे भरून घेतल्यास दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

मात्र, यंदा माणगंगा नदीपात्रात अपेक्षित पाणीसाठा झालेला नसल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बंधारे कोरडे: भूजल पातळीवरही परिणाम माणगंगा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाल्यास त्याचा फायदा केवळ नदीकाठच्या शेतीपुरता मर्यादित राहत नाही. बंधाऱ्यांमधील पाणी जमिनीत मुरल्याने परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होते. परिणामी, विहिरी आणि कूपनलिकांना पाणी टिकून राहते. पावसाळ्यानंतरही काही काळ शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.

मात्र, लिंगीवरे, गिड्डे वस्ती आणि यादव वस्ती येथील बंधारे कोरडे असल्याने या जलसाठ्यांचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. पावसाळ्यातच बंधाऱ्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नाही, तर आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी उपलब्ध करून देऊन बंधारे भरून घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, जनावरांसाठी पाणी आणि हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा प्रश्नही गंभीर ठरू शकतो. पाण्याचे स्रोत आटल्यास आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्यास पशुधन सांभाळण्याचा खर्च वाढतो. त्यामुळे माणगंगा नदीपात्रात पाणी उपलब्ध होणे ही केवळ शेतीचीच नव्हे, तर पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचीही गरज आहे.

माणगंगा नदीपात्रात पाणी आल्यास तसेच नदीवरील बंधारे भरल्यास मोठ्या क्षेत्राला त्याचा लाभहोऊ शकतो. पावसाळा संपला तरी नदीपात्र कोरडेच असल्याने आगामी काळातील पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. शेतीसाठी पाण्याची गरज आणि त्यातच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न, अशा परिस्थितीचा सामना नदीकाठच्या शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

माणगंगेला पाणी मिळणार कधी ?

नदीपात्रात पाणी उपलब्ध करून यादव वस्तीसह नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा करण्यासाठी संबंधित यंत्रणा काय पावले उचलणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून नदीकाठच्या गावांना दिलासा देण्याची गरज आहे.

दिघंची: माणगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे
Dr. Smita Jadhav : डॉ. स्मिताताई जाधव यांचे राजारामबापूंना अभिवादन

दिघंची येथील निंबाळकर तलावात पूर्ण क्षमतेने टेंभूचे पाणी सोडून यादव वस्ती बंधारा तसेच भक्तीचा मळा येथील तलाव तातडीने भरावा, अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी घेतलेल्या दुष्काळ आढावा बैठकीत लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिघंची परिसरात मोठ्या प्रमाणात दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.

- शहाजी यादव, युवा नेते, दिघंची.

जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न

माणदेशातील शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना माणगंगा नदी आणि तिच्यावरील बंधाऱ्यांचा सिंचनासाठी आधार मिळतो. मात्र, नदीपात्र कोरडे राहिल्याने शेतीच्या पाण्याचे नियोजन करणे कठीण बनत आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे, सिंचनाची व्यवस्था करणे आणि शेतीचा खर्च भागविणे, अशी आव्हाने शेतकऱ्यांसमोर आहेत.

दिघंची: माणगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे
Sangli : युएलसीची जमीन तडजोडीने देण्याचा अधिकार महासभा, आयुक्तांना नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news