

Shambhuraj Desai on Manoj Jarange protest
विटा : सणासुदीच्या काळात आंदोलन करणे योग्य नाही. मराठा आरक्षणाबाबत बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. उर्वरीत मागण्या न्यायप्रविष्ठ आहेत. सरकारची चर्चेची तयारी आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवावे, असे आवाहन पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
येथील विट्याचा राजा सार्वजनिक गणेशात्सव मंडळाला मंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली. यावेळी मंत्री देसाई यांच्याहस्ते श्रीं ची आरती करण्यात आली. त्यानंतर मंत्री देसाई यांनी विविध विषयावर आपली भूमिका मांडली. यावेळी आमदार सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, मंडळाचे उपाध्यक्ष अभिजित पवार उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले की, आपण स्वतः अंतरवाली सराटीला जावून मनोज जरांगे-पाटील यांची मराठा आरक्षण विषयावर चर्चा केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मार्गी लागल्या आहेत. आता उर्वरीत विषय न्यायालयाच्या कक्षेत आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात आंदोलन होऊ नये, ते थांबविण्यात यावे असे आपणास वाटते.
दरम्यान, सरकारमध्ये तिन्ही पक्षाचा चांगला समन्वय आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सव काळात कधीच मुंबई आणि ठाणे परिसर सोडत नाहीत. ते दरे येथे असल्याची अफवा आहे. मात्र, अशा अफवा पसरवून सरकार अस्थिर होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्तेतील तिन्ही पक्षांची समन्वय समिती आहे. आम्ही चर्चा करीत असतो.
दरम्यान, खानापूर मतदारसंघातील भाजपसहित अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेशाबाबत विचारले असता, आमचे आमदार असणाऱ्या मतदारसंघात भाजपने कितीही पक्ष प्रवेश घेतले, तरी त्या मतदारसंघाचा कर्णधार हा आमदारच असतो. त्यामुळे कोणतीही अडचण नाही. आमदारांचा शब्दच त्या मतदरासंघात प्रामुख्याने मानला जाईल, अशी रोखठोक भूमिका मांडत आमदार सुहास बाबर हे विधीमंडळाच्या शाळेतील अभ्यासू विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षभरात त्यांच्या कामाची पद्धत सर्वांनी पाहिली आहे. त्यामुळे कसलीही अडचण भविष्यातही राहणार नाही. सरकारची ताकद आमदार बाबर यांच्या पाठीशी राहिल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.