

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीची आम्ही तयारी सुरू केली आहे. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील या भाजपमध्ये आल्यामुळे आमची ताकद वाढली आहे. महापालिकेवर भाजप महायुतीचा झेंडा फडकणार आहे. महायुतीचे 60 ते 65 उमेदवार विजयी होतील. महापालिकेची निवडणूक आम्हीच जिंकणार, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
येथील स्टेशन चौकात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिकांच्या निवडणुका डिसेंबरदरम्यान होतील. तत्पूर्वी ऑक्टोबरदरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका सुरू होतील. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीचे 60 ते 65 उमेदवार विजयी होतील. यात शंका नाही. मात्र आम्ही कोणतीही निवडणूक सहज घेत नाही, त्यासाठी परिश्रम घेतो. काहींचा भाजप प्रवेश झाला आहे. काहींचा प्रवेश निश्चित झाला आहे. काहींशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आमची ताकद वाढतच राहणार आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिकेच्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी निधीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जयश्री पाटील यांनी केली आहे. फडणवीस यांनी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. निधी लवकर मिळाल्यास महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महापालिका इमारतीचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न राहील. शेरीनाला प्रकल्पास निधी मिळेल. लवकरच या कामास मंजुरी मिळेल.