

विटा : कुस्तीगीर संघटनांमधील मतभेद, श्रेयवाद आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वर्षात तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होतात, त्यामुळे महाराष्ट्र केसरी किताबाची किंमत कमी होत आहे, तरी वर्षाकाठी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, या मागणीसाठी लवकरच आझाद मैदानावर उपोषण आंदोलन करू असा इशारा डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी दिला आहे.
याबाबत डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील म्हणाले की, राज्यात १९६० पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही राज्यातील सर्वोच्च मानाची एकमेव स्पर्धा घेतली जात होती. मात्र अलीकडे संघटनांमधील मतभेद, श्रेयवाद आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वर्षभरा त तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असून त्यामुळे कुस्तीगीरांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होते. शिवाय केसरी किताबाची किंमत घटत आहे.
तसेच अनेक स्पर्धा झाल्यामुळे खरा महाराष्ट्र केसरी कोण हेच लोकांना समजेनासं झालं आहे. गतवर्षी निवडणुका असल्याने २०२४ मधील स्पर्धा पुढे ढकलली. परिणामी २०२५ मध्ये दोन स्पर्धा झाल्या आणि नोव्हेंबरमध्ये पुन्हा दोन स्पर्धा होणार आहेत. आता आणखी एक संघटना उदयास आल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत एका वर्षात चार ते पाच महाराष्ट्र केसरी निर्माण होणार आहेत.
वास्तविक प्रत्येक महाराष्ट्र केसरीला शासनाकडून पेन्शन आणि अन्य सुविधा दिल्या जातात. मग एका वर्षाला अनेक महाराष्ट्र केसरी असतील तर शासन कोणाला खरा महाराष्ट्र केसरी मानणार? ही जबाबदारी शासनाची आहे. लवकर निर्णय न घेतल्यास आम्ही आझाद मैदान, मुंबई येथे उपोषणाला बसणार आहोत. आपण याप्रश्नी यापूर्वी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी अशी मागणी केली होती. मात्र ती अद्याप मान्य न झाल्याने व तोडगा न निघाल्यामुळे त्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आमचा कोणत्याही कुस्तीगीर संघटनेला विरोध नाही, मात्र दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे असेही पाटील यांनी सांगितले आहे.