कुस्तीत नव्या पायंड्याची गुढी ; ‘महाराष्ट्र केसरी’ वेताळ शेळके याने कुस्तीशौकिनांची जिंकली मने

देशातील कुस्तीशौकिनांनी कौतुक केले
Ahilyanagar
कुस्तीशौकिनांची जिंकली मने pudhari
Published on
Updated on

डॉ. सूर्यकांत वरकड

अहिल्यानगर : कुस्ती आणि वाद हे नित्याचं; पण त्याला अपवाद ठरली कर्जत (जि. अहिल्यानगर) येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. कुस्ती जिद्दीचा आणि शिस्तीचा खेळ असताना याचा प्रत्ययही कर्जतमध्ये दिसून आला. फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे अहिल्यानगर शहरात आयोजित कुस्ती स्पर्धेला वादाचे गालबोट लागले. राज्य कुस्तीगीर परिषदेने कर्जत (अहिल्यानगर) येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत संयम, सामर्थ्य, शिस्त, दोस्ती अशा विविध गुणांचे दर्शन झाले. अंतिम सामन्यात महाराष्ट्र केसरी विजेता वेताळ शेळके याने उपविजेता पृथ्वीराज पाटील याला खांद्यावर उचलून घेत मैदानात फेरी मारली. कुस्तीत दोस्तीचे दर्शन झाले अन् त्याच्या याच कृत्याचे देशातील कुस्तीशौकिनांनी कौतुक केले.

फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे अहिल्यानगर शहरामध्ये आ. संग्राम जगताप यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. आ. जगताप यांनी मल्लांसाठी प्रचंड बक्षिसे ठेवून आखाडा आणि मल्लांची राहण्याची चोख व्यवस्था केली होती. सुमारे 125 पंचाची टीम व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच नियुक्त करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी ख्यातनाम मल्ल बाला रफिक शेख, माऊली जमदाडे, माऊली कोकाटे, महेंद्र गायकवाड, प्रकाश बनकर, हर्षवर्धन सदगीर, शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, संदीप मोटे यांनी सहभाग नोंदविला होता.

गादी विभागामध्ये अंतिम लढत शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. मात्र, हीच लढत कुस्तीला गालबोट लावणारी ठरली. पृथ्वीराज मोहोळ याने ढाक डाव टाकत शिवराज राक्षे याला खाली खेचले. पंचांनी चितपटाचा निर्णय दिला. मात्र, तो निर्णय शिवराज राक्षे याला मान्य नव्हता. त्याच्या प्रशिक्षकाने पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. मात्र, दोन्ही बाजूच्या पंचांनी चितपटाचा निर्णय दिल्याने निर्णय बदलला नाही अथवा त्याचा रिप्लेही दाखवला नाही. त्यामुळे मैदानावर गोंधळ झाला आणि पंचांशी चर्चा सुरू असताना शिवराज राक्षे याने पंचाला लाथ मारली.

‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम फेरीतही तीच परिस्थिती पाहायला मिळाली. सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम कुस्ती झाली. दोन्ही मल्ल तोडीस तोड असल्याने एकमेकांना चाल करू देत नव्हते. त्यात महेंद्र गायकवाडचा कॉस्च्यूम फाटला. त्याने गुणाची मागणी केली. मात्र, त्याची मागणी फेटाळून लावली. दोघांनाही निष्क्रियतेचे गुण मिळाले. अखेरच्या काही सेकंदांत महेंद्र गायकवाड मैदानाबाहेर गेल्याने पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला एक गुण दिला. त्यावर महेंद्र गायकवाडच्या प्रशिक्षकाने आक्षेप घेतला. मात्र, त्यांचा आक्षेप फेटाळून लावला. त्यानंतर महेंद्र गायकवाड याने मैदान सोडले. त्याने पुन्हा पंचांवर राग काढला. त्यामुळे अंतिम कुस्तीही वादग्रस्त ठरली.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे कर्जत (जि. अहिल्यानगर) येथे आ. रोहित पवार मित्र मंडळ व जिल्हा तालीम संघातर्फे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. माती व गादीसाठी स्वतंत्र आखाडे, तांत्रिक अधिकार्‍यांची टीम आणि पंचांचा जथ्था स्पर्धेसाठी तैनात करण्यात आला होता. ही स्पर्धा विनावादाची झाल्याने कौतुकाचा विषय ठरली. महाराष्ट्र केसरी किताबासाठी गादी विभागातील अंतिम लढत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यात झाली. पहिल्या सत्रात शिवराज राक्षे आक्रमक होता. त्याने चार गुणांची कमाई केली. मात्र, दुसर्‍या सत्रात पृथ्वीराज पाटील याने चपळाई करीत मोळी बांधत शिवराज राक्षेला चितपट केले.

महाराष्ट्र केसरी किताबासाठी पृथ्वीराज पाटील विरुद्ध सोलापूरचा वेताळ शेळके यांच्यात लढत झाली. पहिल्याच मिनिटात पृथ्वीराज पाटील याने एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेताळ शेळके याने तो परतावून लावला. त्यात पाटील याला एक गुण मिळाला. त्यानंतर पृथ्वीराज पाटील याचा दुहेरी पटाचा प्रयत्नही फसला. त्यात निष्क्रियतेचा एक गुण पाटील याला मिळाला. कुस्ती सुरू होऊन तीन मिनिटे झाली होती. पृथ्वीराज पाटील थोडा बेसावध होताच वेताळ शेळके याने थ्रो केला. त्याला पंचांनी दोन गुण दिले. मात्र, त्यावर वेताळच्या प्रशिक्षकांनी आक्षेप घेत चार गुणांची मागणी केली. तिसर्‍या पंचांनी रिप्ले पाहून वेताळ शेळकेला चार गुण दिले. पहिला हाफ संपण्याच्या वेळी पृथ्वीराज पाटील याने चढाई करीत दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचांनी शिट्टी वाजविली. गुणांची मागणी केली. तिसर्‍या पंचांनी टाईम संपल्याचे सांगत गुण दिले नाही. पंचांनी अपील फेटाळून लावला. त्यानंतर पृथ्वीराजने वेताळवर मोळी बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसला. शेवटी वेताळ शेळके याने बाजी मारली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news