

सांगली : तुमचा डीएनए ओबीसी असेल, तर ओबीसींचे आरक्षण वाचवा, नाही तर तुम्हाला घरी बसवायला ओबीसींना वेळ लागणार नाही. अमेरिकेतील एका पोराच्या आवाहनावर जर देशातील तरुणाई एकवटत असेल, तर ५०-६० टक्के ओबीसी जेव्हा एकवटेल आणि राजकीय भूमिका घेईल, तेव्हा तुमची पळता भुई थोडी होईल. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ओबीसींना राजकारणात येऊही देत नाही. उद्या जेव्हा ओबीसींकडे मते मागायला याल, तेव्हा ओबीसी काय आहेत हे दाखवून देऊ. येथील कारखानदार, भांडवलदार आणि सत्ताधाऱ्यांना घरी बसवू, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला.
सांगलीत एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, इतर मागासवर्गीय समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सवलती आणि इतर सोयी-सुविधा लागू करण्याचा जो निर्णय शासनाने घेतला आहे, त्याला कोणताही तर्क नाही. प्रत्येक निर्णयामागे काही अहवाल असतो. तसा इथे काही आहे का? झुंडीच्या दबावाखाली शासन निर्णय घेत आहे. असेच असेल तर ओबीसींच्या योजनांचे फायदे मराठा बांधवांनाच का देता? ते जैन आणि ब्राह्मण समाजाला का देत नाही? असे करून शासनाने घटनेला हरताळ फासला आहे. याविरुध्द ओबीसींनी बोलायचेही नाही का? निवडणुकीपूर्वी तुम्हाला मदत करण्याची भूमिका आम्ही जाहीरपणे घेतली होती, पण तुम्ही ओबीसींना वाऱ्यावर सोडणार असाल, तर आमच्याकडेही मतदानाचे बटण आहे.